पेशींचे गुप्त संदेशवहन रोखून कर्करोगाशी सामना करण्याची नवी सायबर वॉर रणनीती वैज्ञानिकांनी तयार केली आहे. तेल अविव (इस्रायल) येथील  वैज्ञानिक तसेच राइस अँड जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, अमेरिका यांच्या संयुक्त प्रकल्पात असे सांगण्यात आले की, कर्करोगाच्या पेशींवर आपण औषधे व प्रारणांचा मारा केला तरी अनेकदा त्या पुन्हा हल्ला करतात. औषधे किंवा उपचारपद्धती अपयशी ठरण्याचे कारण म्हणजे कर्करोगाच्या बंडखोर पेशी एकमेकांशी संवाद साधतात, सहकार्य करतात व सामुदायिक निर्णयही घेतात, त्यामुळे ते माणसाच्या प्रतिकारशक्ती यंत्रणेला चकवा देतात.
राइस सेंटर फॉर थिऑरिटिकल फिजिक्स या संस्थेचे सहसंचालक हर्बर्ट लेव्हाइन यांनी सांगितले की, कर्करोगाच्या पेशी सुनियंत्रित नसतात हा समज चुकीचा आहे. कर्करोगाच्या पेशी हा एक अत्याधुनिक शत्रू आहे असे समजायला हरकत नाही. कर्करोगाच्या पेशी या प्रगत संदेशवहनाच्या मदतीने  एकत्र काम करतात व निरोगी पेशींना गुलाम करतात. मेटॅस्टेसेसच्या प्रक्रियेने कर्करोग अनेक अवयवात पसरतो. या पेशी औषधांना दाद तर देत नाहीतच शिवाय शरीराच्या प्रतिकारशक्ती प्रणालीला हुलकावणी देतात, असे या संशोधनाचे सहलेखक इशेल बेन जेकब यांनी सांगितले.
बेन जेकब, लेव्हाइन व डोनाल्ड कॉफे हे जॉन हॉपकिन्स संस्थेतील कर्करोग संशोधक आहेत. केमोथेरपीच्या औषधांना कर्करोगाच्या पेशी चकवा देतात. जीवाणूंमध्ये जसे एकमेकांत संदेशवहन होत असते व ते प्रतिजैविकांच्या हल्ल्यांना सामूहिकरीत्या तोंड देतात, तसेच कर्करोगाच्या पेशीही करतात. जेव्हा केमोथेरपीची औषधे शरीरात प्रवेश करतात तेव्हा कर्करोगाच्या पेशींना  लगेच ते समजते. लगेच गाठीतील पेशींना संदेश जातात व नंतर या सदोष पेशी निद्रिस्त अवस्थेत जाऊ लपून बसतात. जेव्हा या औषधाचा प्रभाव संपतो तेव्हा ऑल क्लिअरचा दिलासा मिळतो व कर्करोगाच्या पेशी पुन्हा जोमाने काम करू लागतात. जर आपण पेशींमधील संदेशवहनाची संकेतावली उलगडली तर या पेशी निद्रिस्त व जागरूक अवस्थेत जाण्याची प्रक्रियाच मोडून काढता येईल, त्यामुळे केमोथेरपीचा उपचार अधिक प्रभावीपणे करता येईल, असे मत बेन जेकब यांनी व्यक्त केले आहे.
कर्करोगाच्या पेशींविरोधात सायबर युद्ध पुकारण्याची हीच योग्य वेळ आहे. जीवाणूंच्या सामूहिक आयुष्याचा अभ्यास केल्यानंतर अनेक बाबींचा उलगडा होत आहे. आता कर्करोग पेशींमधील संदेशवहन नष्ट केले तर त्यावरही प्रभावीपणे उपचार करणे शक्य आहे. अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठाने फेल्युअर्स इन क्लिनिकल ट्रिटमेंट ऑफ कॅन्सर या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत कर्करोगाच्या संशोधनातील नव्या दिशा स्पष्ट करण्यात आल्या.

Story img Loader