Man Committed Suicide After Denied PMJAY Benefits : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ७२ वर्षांच्या कर्करोग पीडिताने प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेद्वारे उपचार नाकारल्याने आत्महत्या केली आहे. या घटनेतील पीडित कर्नाटक सरकारचा सेवानिवृत्त कर्मचारी होता. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर १५ दिवसांनी त्याने हे पाऊल उचलले.
पीडित व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, “रुग्णाला जेव्हा हे लक्षात आले की, प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत त्याला ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यास रुग्णालयाने नकार दिला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.”
“आम्ही आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे ज्येष्ठ नागरिक कार्ड तयार केले होते. ज्याद्वारे त्यांना ५ लाखांचे विमा संरक्षण मिळते. तरीही किडवाई मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजीने, अद्याप राज्य सरकारचे आदेश आलेले नाहीत असे म्हणत हा लाभ नाकारला. पण त्यांनी आम्हाला उपचारांवर ५० टक्के सूट दिली,” असे पीडिताच्या कुटुंबीतील एकाने सांगितले. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
पीडित मृताच्या कुटुंबातील सदस्याने पुढे सांगितले की, “आम्ही नुकतेच चाचण्या आणि स्कॅन सुरू केले होते. यासाठी २०,००० रुपये खर्च केले होते. केमोथेरपीनंतर उपचारांसाठी मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. आम्ही किडवाई मेमोरियल इन्स्टिट्यूटमध्येच केमोथेरपीचे उपचार करण्याची तयारी केली होती. आम्ही पैसे देण्यास तयार होतो, पण त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांनी आत्महत्या केली. मी असे म्हणत नाही की, हा प्रकार थेट लाभाच्या अभावामुळे झाला आहे.”
रुग्णालयाचे स्पष्टीकरण
“प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य ज्येष्ठ नागरिक योजना अद्याप लागू झालेली नाही. आम्ही आदेशांची वाट पाहत आहोत,” अशी प्रतिक्रिया केएमआयओचे प्रभारी संचालक डॉ. रवी अर्जुनन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना आहे. या योजनेमार्फत गरजूंना वैद्यकीय तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेता येतो. गरीब लोकांना उत्तम दर्जाची दवाखान्याची सोय उपलब्ध व्हावी, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे गरिबांना आरोग्याशी संबंधित कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, अशा पद्धतीने या योजनेची रचना करण्यात आली आहे.