देशाची विविधता, सहिष्णुता आणि विभिन्नता या मूलभूत मूल्यांना धक्का लागू देणार नाही, असे सूचक प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दादरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. देशाच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून समाजात बंधुभावाचे, एकमेकांना सांभाळण्याचे भान प्रत्येकाला असायले हवे आणि ते सगळ्यांनी बाळगायला हवे, असेही मुखर्जी यांनी म्हटले आहे. विभिन्नता आणि बहुविधता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाने ते मनावर कोरलं पाहिजे आणि त्याला अनुसरूनच आपले आचरण असायला हवे, असेही ते पुढे म्हणाले.तसेच भारताच्या राष्ट्र म्हणून ज्या मध्यवर्ती कल्पना आहेत आणि ज्या घटनेत प्रतिबिंबित झाल्या आहेत, त्या कधीही विसरता कामा नये, असा सूचक सल्लाही मुखर्जी यांनी देऊ केला.
दादरी येथे महंमद अखलाख या मुस्लिम नागरिकाला घरात गोमांस ठेवल्याच्या अफवेतून हत्या करण्यात आली. याप्रकरणावरून देशात वातावरण तापले असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तर, दादरी घटनेला मोदी सरकारच जबाबदार असल्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी तर थेट संयुक्त राष्ट्रसंघालाच याबाबत पत्र लिहून दादरी प्रकरण हा भाजपचा सुनियोजित कट असल्याचा दावा केला आहे.