पाकिस्तानचे माजी हुकूमशाह व अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावरील परदेश प्रवासाची बंदी उठवण्यास पाकिस्तानी न्यायालयाने नकार दिला. मुशर्रफ यांना अशी परवानगी देणे किंवा न देण्याचा निर्णय आमच्या अधिकारकक्षेत येत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.
सिंध उच्च न्यायालयाने मुशर्रफ यांचे नाव निर्गमन नियंत्रण यादीतून वगळण्यास नकार दिला आहे. याबाबत मुशर्रफ यांनी सरकारकडेच दाद मागावी असे न्यायालयाने स्पष्ट केले. पाकिस्तान सरकारने मुशर्रफ यांना माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची हत्या व इतर गुन्हेगारी प्रकरणात सामील असल्याच्या आरोपावरून अटक केली असून, त्यांना देश सोडून जाण्यास बंदी घातली आहे. माजी अध्यक्ष व हुकूमशाह असलेले मुशर्रफ यांना या सर्व प्रकरणात जामीन मात्र मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र त्यांचे नाव निर्गमन प्रतिबंध यादीतून काढलेले नाही.
मुशर्रफ यांच्या वकिलाने न्यायालयात असे सांगितले, की आमचे अशील परवेझ मुशर्रफ यांच्या मातोश्री ९५ वर्षांच्या असून त्या दुबईला असतात व त्यांना भेटणे जरुरीचे आहे. तसेच निर्गमन नियंत्रण यादीत आमच्या अशिलाचे नाव टाकून त्यांच्या मूलभूत हक्कांचा भंग करण्यात आला आहे.