गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली इशरत जहाँ हिच्याबाबत डेव्हिड हेडलीने दिलेली कथित माहिती उघड करता येणार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी येथे केली. अमेरिकेसोबत असलेल्या गोपनीय करारामुळे ही माहिती देणे शक्य नाही, असे ते म्हणाले.
हेडली हा मुंबईवर झालेल्या २६-११च्या हल्ल्यातील एक गुन्हेगार असून तो सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. एफबीआय या अमेरिकी गुप्तहेर संघटनेला दिलेल्या जबानीत हेडली याने इशरतच्या नावाचा उल्लेख केला होता, तसेच ती एका पाकिस्तानी दहशतवादी संघटनेसाठी काम करीत होती, अशी माहितीही त्याने दिल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. या पाश्र्वभूमीवर शिंदे यांना विचारले असता त्यांनी असमर्थता दर्शविली. आपली राष्ट्रीय अन्वेषण संस्था आणि अमेरिकेची एफबीआय यांच्यातील करारानुसार हेडलीच्या जबानीबाबतची कोणतीही गोपनीय माहिती उघड करणे शक्य नाही. राष्ट्रीय अन्वेषण संस्थेने गृह मंत्रालयाला याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतरच याविषयी भाष्य करता येईल, असे ते म्हणाले.
एनआयएच्या अहवालात इशरतचा उल्लेख नाही
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी डेव्हिड हेडली याची जबानी घेतल्यानंतर एनआयएने तयार केलेल्या अहवालात इशरत जहाँचा उल्लेख करण्यात आलेला नाही, असे माजी केंद्रीय गृहसचिव जी.के.पिल्लाई यांनी सांगितले. मात्र गुजरातमधील चकमकीत इशरतसमवेत ठार झालेले अन्य दोघेजण पाकिस्तानी नागरिक होते आणि त्यांना लष्कर-ए-तैय्यबाच्या तळावर प्रशिक्षणही देण्यात आले होते, अशी माहिती पिल्लाई यांनी दिली. इशरत ही दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा गुप्तचर यंत्रणांचा अहवाल होता, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader