काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा दिला. टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये काँग्रेस पक्षाची बाजू मांडणाऱ्या गौरव वल्लभ यांनी पक्षाच्या काही निर्णयांचा विरोध केला. पक्षात घुसमट होत आहे. तसेच काँग्रेसने आपले मूळ तत्व सोडून चुकीच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले असल्याचेही ते म्हणाले.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये गौरव वल्लभ म्हणाले की, काँग्रेस पक्ष दिशाहीन झाला असून आता पक्षात राहण्यात अर्थ वाटत नाही. मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही, तसेच देशाची संपत्ती वाढविणाऱ्या उद्योगपतींना शिव्याही घालू शकत नाही. त्यामुळे मी काँग्रेसची प्राथमिक सदस्यता आणि सर्व पदांचा राजीनामा देत आहे.

अरविंद केजरीवालांवर बलात्काराचा आरोप? प्रसिद्ध वृत्तपत्राचे कात्रण चर्चेत, अटकेचं खरं कारण काय?

प्रा. वल्लभ पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, सनातनच्या विरोधात जेव्हा काँग्रेस पक्षाचे नेते बोलत होते, तेव्हाच मी अस्वस्थ झालो होतो. राम मंदिर लोकार्पणाच्यावेळीही पक्षाने जी भूमिका घेतली, ती मला रुचली नाही. सध्या काँग्रेसची घोडदौड चुकीच्या दिशेने सुरू आहे. एकाबाजूला ते जातीनिहाय जनगणनेची गरज असल्याचे बोलतात, दुसऱ्या बाजूला ते संपूर्ण हिंदू समाजाचा विरोध करतात. अशाप्रकारची कार्यपद्धती जनतेमध्ये चुकीचा संदेश देते. हा पक्ष केवळ काही धर्मांना पाठिंबा देत असल्याचा संदेश जात आहे. हे काँग्रेसच्या मूळ विचारधारेच्या विरोधात आहे.

वल्लभ यांनी आपला राजीनामा देत असताना दोन पानांचे पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, देशाची संपत्ती वाढविण्याचे काम उद्योगपती करतात. मात्र काँग्रेस सातत्याने उद्योगपतींना बोल लावण्याचे काम करत आहे. “काँग्रेसनेच भारतात खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा पाया रचला. आता काँग्रेस याच नितीच्या विरोधात गेला आहे. या देशात व्यवसायाद्वारे पैसा उभारणे गुन्हा आहे का? असाही प्रश्न वल्लभ यांनी उपस्थित केला.

“मी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा माझे ध्येय होते की, माझ्या क्षमता आणि कौशल्य वापरून या देशाच्या आर्थिक विषयांमध्ये योगदान देणे. आज पक्ष सत्तेत नसला तरी देशाचे आर्थिक धोरण कसे असावे, देशाचे हीत कशात आहे? हे जाहिरनामा आणि भूमिकेतून ठरवू शकतो. पण पक्षपातळीवर यामध्ये काहीही होताना दिसत नाही”, असाही आरोप वल्लभ यांनी केला.

गौरव वल्लभ यांनी राजस्थानच्या उदयपूर विधानसभा मतदारसंघातून २०२३ साली निवडणूक लढविली होती. मात्र भाजपाच्या उमेदवाराकडून त्यांचा ३२ हजार मतांनी पराभव झाला होता.

ताजी अपडेट

गौरव वल्लभ यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झाला.

भाजपात प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना गौरव वल्लभ म्हणाले की, काँग्रेस सोडत असताना मी माझे म्हणणे पत्राद्वारे मांडले आहे. राम मंदिराचे निर्माण झाल्यानंतर उद्घाटनासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जायला हवे होते, असे मला वाटत होते. तसेच आर्थिक धोरणावर काँग्रेस पक्ष चुकीचे निर्णय घेत आहे, असेही पत्रात नमूद केलं. ज्या उद्योगपतींनी देशाचा विकास केला, त्यांना मी सकाळ-संध्याकाळ शिव्या देऊ शकत नाही.