पीटीआय, नवी दिल्ली

हास्यकलाकार कुणाल कामरा याने सोमवारी ‘बुक माय शो’ला पत्र पाठवून यादीतून काढू नये (डिलीस्ट) अथवा आपला कार्यक्रम किती जणांनी पाहिला, किती उत्पन्न मिळाले याची माहिती द्यावी अशी मागणी केली होती. त्यावर, ‘‘आम्ही केवळ तिकीटविक्रीसाठी माध्यम आहोत. कोणते कार्यक्रम यादीत ठेवायचे किंवा काढायचे याचा निर्णय संबंधित आयोजक घेतात,’’ असे उत्तर कंपनीकडून देण्यात आले.

आपल्या भूमिकेबद्दल सार्वजनिक पातळीवर चुकीची माहिती दिली जात आहे असे बुक माय शोने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. आमच्या व्यासपीठावरून आम्ही कोणत्याही कलाकाराला त्यांच्या कार्यक्रमाच्या तिकीटविक्रीपासून रोखू शकत नाही. कोणत्याही कार्यक्रमातील आशय ही संबंधित कलाकार आणि आयोजकांची जबाबदारी असते, आमची नाही असेही बुक माय शोने स्पष्ट केले आहे. विविध धार्मिक श्रद्धा असलेल्या नागरिकांना एकत्र आणणे हा आमचा उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे. निष्पक्षपातीपणे आम्ही व्यवसाय करतो व देशाच्या कायद्याला बांधील असल्याचे नमूद केले.

कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनगीत सादर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी कामराविरोधात मोहीम उघडली आहे. त्याचाच भाग म्हणून शिंदे गटाच्या एका नेत्याने बुक माय शोवरून कामराचे कार्यक्रम हटविल्याचा दावा केला होता. त्यानंतर कामराने बुक माय शोला समाजमाध्यमांवरून पत्र लिहिले. त्यानंतर बुक माय शोने आपल्या भूमिकेबद्दल खुलासा करत अशा प्रकारे कार्यक्रम हटविण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले.

कामराच्या पत्रात काय?

● व्यवसायासाठी काय चांगले ते ठरविण्याचा हक्क बुक माय शोला आहे. मला यादीतून वगळण्याचाही तुमचा अधिकार आहे.

● मात्र असा करताना तुम्ही प्रेक्षकांना माझ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यापासून वंचित ठेवत आहात.

● मी तुमच्या व्यासपीठावर २०१७ ते २०२५ पर्यंत कार्यक्रम सादर करत आहे.