मराठी खासदारांना महाराष्ट्र सदनात दुय्यम वागणूक देणारे निवासी आयुक्त विपीन मलिक यांनी शिवसेना खासदारांची जिरवण्यासाठी थेट सदनातील कॅण्टिन बंद करून टाकले आहे. मागील आठवडय़ात खा. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली सेना खासदारांनी सदनावर हल्लाबोल केला होता. मराठी खासदारांना मिळणारी अपमानास्पद वागणूक, निकृष्ट भोजन, उत्तर हिंदी भाषिक खासदारांना मलिक यांच्याकडून मिळणाऱ्या शाही पाहुणचाराविरोधात सेना खासदारांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती.
ही परिस्थिती सोमवापर्यंत सुधारेल, असे आश्वासन मुख्य सचिवांनी खासदारांना दिले होते. परिस्थिती तर बदलली नाहीच उलट कॅण्टीन बंद करण्याचा निर्णय घेऊन मलिक यांनी एक प्रकारे सेना खासदारांना आव्हान दिले आहे. सेना खासदारांनी मलिक यांच्या कार्यालयाच्या भिंतीवर ‘संदेश’ लिहिला होता. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ऐन अधिवेशनाच्या काळात कॅण्टीन बंद झाल्याने सदनातील निवासी खासदारांसह सर्वाचीच गैरसोय झाली आहे. आयआरसीटीसीच्या ताब्यात असलेल्या सदनातील कॅण्टीनमध्ये मराठी नावाचे उत्तर भारतीय पदार्थ मिळतात. त्याविरोधात आमचे काहीही म्हणणे नाही. पण तेदेखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे असतात, अशी तक्रार शिवसेनेच्या खासदारांनी मुख्य सचिवांकडे केली होती. त्यानंतर मलिक यांनी कॅण्टीन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र सदनात निवास करणाऱ्यांना भोजनासाठी इतरत्र जावे लागत आहे.
मलिक यांच्या मराठी द्वेषाची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. महाराष्ट्र डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड प्रमोशन केंद्रातर्फे आयोजित सह्य़ाद्री महोत्सवास मलिक यांनी ऐनवेळी परवानगी नाकारली आहे. या कार्यक्रमात मराठी केंद्रीय मंत्री, मराठी खासदार सहभागी होणार होते. मात्र सभागृहातील खुच्र्याची रचना बदलायची नाही, भोजनासाठी दुसरा मजला वापरायचा, ध्वनिक्षेपण यंत्रणा आम्ही सांगू तीच वापरावी लागेल, अशा जाचक अटींमुळे आयोजकांनी थेट कार्यक्रमाचे स्थानच बदलले. या कार्यकमात मराठी चित्रपट दाखवला जाणार होता. त्यासाठी बँक्वेट हॉलमध्ये टेबलाभोवती मांडलेल्या खुच्र्याची रचना बदलता येणार नसल्याचा अचाट नियम मलिक यांनी पुढे केला.
 सहकार्य तर सोडाच उलट तुघलकी नियम पुढे करणाऱ्या अधिकाऱ्यांशी वाद घालण्याऐवजी आयोजकांनी ऐनवेळी कार्यक्रमाचे स्थान बदलले. मऱ्हाटमोळ्या कार्यक्रमांना परवानगी नाकारणाऱ्या मलिक यांनी त्यांच्या बॅचच्या आयएएस अधिकाऱ्यांसाठी याच सभागृहात पंचतारांकित भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता हे विशेष. मलिक हे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जातात.
त्यामुळे सलग तीन वर्षांचा कार्यकाळ संपूनही मलिक दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात ठाण मांडून आहेत. मलिक यांनी माजी आयएएस अधिकारी उत्तम खोब्रागडे यांची महाराष्ट्र सदनात फुकट राहण्याची व्यवस्था केली होती. बागपतचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांच्यासाठी मलिक यांनी थेट राज्यातील मंत्र्यांसाठी आरक्षित कक्ष उघडून दिले आहे.

दिल्लीत आज सह्य़ाद्री महोत्सव
महाराष्ट्र कल्चरल अ‍ॅण्ड प्रमोशन केंद्रातर्फे आज दिल्लीत सह्य़ाद्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी केंद्रीय मंत्री व मराठी खासदारांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात येईल. ‘पॉवरिंग महाराष्ट्र’ या विषयावर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण होणार आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, श्रीपाद नाईक, रावसाहेब दानवे यांचीही भाषणे होतील. सायंकाळी साडेपाच वाजता जयजयकार हा चित्रपट दाखवला जाईल, असे कार्यक्रमाचे आयोजक प्रा. मनीष दाभाडे यांनी सांगितले.

Story img Loader