वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवानंतर ६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बंडाची चौकशी करणाऱ्या सभागृह नियुक्त चौकशी समितीने आपला अंतिम अहवाल सादर केला आहे. यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा या पदाची सूत्रे घेण्यापासून रोखण्याची शिफारस या समितीने केली आहे. ही शिफारस या समितीच्या अंतिम अहवालातील निष्कर्षांपैकी एक आहे. ट्रम्प व त्यांच्या समर्थकांनी २०२० ची अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल झुगारण्यासाठी कसे प्रयत्न केले, याचा र्सवकष परामर्श या द्विपक्षीय सदस्यांचा समावेश असलेल्या समितीने घेतला आहे. हा अहवाल गुरुवारी संध्याकाळी उशिरा प्रसिद्ध झाला.

या ८४५ पृष्ठांच्या अहवालात एक हजारपेक्षा जास्त जणांच्या मुलाखती आहेत. ईमेल, मजकूर, दूरध्वनी संवाद ध्वनिमुद्रण व दीड वर्षांच्या तपासात गोळा केलेल्या ट्रम्प यांच्यावरील विविध आरोपांचा समावेश असलेल्या दस्तावेजांद्वारे हा अहवाल तयार केला आहे. ज्या सात राज्यांत ट्रम्प यांचा पराभव झाला होता, तेथे त्यांनी बनावट मतदानास कायदेशीर स्वरूप देण्याचा संशयित प्रयत्नांस फूस दिल्याचा आरोप आहे. असे करणे अवैध आहे याची चिंता त्यांच्या वकिलांना वाटत असूनही त्यांनी खोटय़ा ‘इलेक्टोरल कॉलेज मतपत्रिका’ काँग्रेस व राष्ट्रीय अभिलेखागारांना सादर करण्यात ट्रम्प यांचा सक्रिय सहभाग होता.

अमेरिकन प्रतिनिधीगृह व सेनेटचा समावेश असलेल्या ‘यूएस कॅपिटॉल’वर ६ जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हल्ल्याची चौकशी करणाऱ्या या समितीची १९ डिसेंबर रोजी वॉशिंग्टनमधील ‘कॅपिटॉल हिल’वर अंतिम बैठक झाली. सोमवारी आपल्या अखेरच्या बैठकीत या समितीने ट्रम्प यांच्याविरुद्ध किमान चार गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप निश्चित करता येतील, असे न्याय विभागास सुचवले. एखाद्या अधिकाऱ्याला दुखापत करणे, त्याच्या कामात अडथळे आणणे व देशद्रोहाचा कट रचण्याच्या आरोपांचे सबळ पुरावे असल्याचे समितीने आपल्या अंतिम निष्कर्षांत नमूद केले आहे. या त्या पुराव्याचा सरळ निष्कर्ष निघतो, की ६ जानेवारीच्या हल्ल्यामागचे मुख्य कारण एकच व्यक्ती होती. ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प! त्यांचे अनुकरण इतर अनेकांनी केले. ६ जानेवारीची कोणतीही घटना त्यांच्या सहभागाशिवाय घडलीच नसती, असे अहवालात म्हटले आहे.

‘अहवाल पक्षपाती’

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ’ समाजमाध्यम खात्यावर या अहवालावर त्वरित आपला आक्षेप नोंदवला. त्यांनी ही अहवाल अत्यंत पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी या अहवालातील विशिष्ट निष्कर्षांना समाधानकारक उत्तर दिले नाही. मात्र, ६ जानेवारी रोजी ‘यूएस कॅपिटल’ची सुरक्षायंत्रणेच्या अपयशाबद्दल त्यांनी सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांना जबाबदार ठरवले. तसेच या अध्यक्षीय निवडणुकीत फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याच्या आपल्या आरोपांचाही ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला.