अमेरिकी काँग्रेसमध्ये प्रथमच हिंदू  धर्मगुरूंच्या वेदिक मंत्रघोषात दीपावलीचा सण साजरा होत आहे. किमान बाराहून अधिक प्रभावी भारतीय-अमेरिकी सदस्य कॅपिटॉल या अमेरिकी काँग्रेसच्या इमारतीत दीपप्रज्वलनासाठी उपस्थित होते. कॅपिटॉल हिल येथे प्रथमच दीपावली साजरी करण्याचा कार्यक्रम झाला. अमेरिकी काँग्रेसमधील भारत समर्थक गटाने व भारतीय-अमेरिकी सदस्यांनी त्याचे आयोजन केले होते. भारतीय-अमेरिकी समुदायाचा अमेरिकी काँग्रेसमध्ये प्रभाव वाढत आहे, त्यामुळे या वेळी दीपावलीचा सण कॅपिटॉल हिल येथे धुमधडाक्यात साजरा होत आहे. काँग्रेसचे सदस्य जो क्रॉले व पीटर रोसकॅम यांनी भारतीय-अमेरिकी समुदायाच्या उपस्थितीत दीपावली सणानिमित्त कॅपिटॉल हिल येथे कार्यक्रम आयोजित केला होता. भारत-अमेरिका यांच्या मैत्रीवर या वेळी भर देण्यात आला आहे. प्रतिनिधिगृहातील डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी म्हणाल्या, की दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी येथे आले आहे. अमेरिका भारताची आभारी आहे. कारण आमची नागरी हक्क चळवळ ही भारतातील अहिंसा चळवळीवर आधारित आहे. मार्टिन ल्यूथर किंग यांना तेथेच हे शिक्षण मिळाले व त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे; तसेच लाखो भारतीय-अमेरिकी लोकांची येथील उपस्थितीही प्रेरणादायी आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे असे त्या म्हणाल्या.
अमी बेरा हे सध्याच्या काँग्रेसमधील एकमेव भारतीय अमेरिकी असलेले सदस्य म्हणाले, की दीपावली छान साजरी केली जात आहे. भारतीय-अमेरिकी म्हणून काँग्रेसमध्ये आपण काम करणे अभिमानास्पद वाटते. दोन्ही देशांतील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. दीपावली तिकिटांच्या मोहिमेचा आग्रह धरणाऱ्या काँग्रेसच्या सदस्या कॅरोलिन मॅलोनी यांनी सांगितले, की अमेरिकी पोस्ट सेवेने ही विनंती फेटाळल्याने आपण नाराज आहोत.

Story img Loader