पंजाब काँग्रेसमधील नेत्यांमधील एकमेकांवरील हल्ले सुरूच आहेत. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची पाकिस्तानी मैत्रीण अरूसा आलम आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संबंधांची चौकशी करणार असल्याचं म्हटलं. यानंतर पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. या आरोपांनंतर अमरिंदर सिंग यांच्याकडूनही ताबोडतोड प्रत्युत्तर आलंय. अमरिंदर सिंग यांनी अरूसा आलम यांचा आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा फोटो ट्विट करत सुखजिंदर सिंग रंधावा यांना घेरलंय.

सुखजिंदर सिंग रंधावा यांनी पंजाबीमध्ये एक ट्विट केलं होतं. यात त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अरूसा आलम यांच्या कथित संबंधांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. मात्र, टीकेनंतर सुखजिंदर सिंग यांनी काही वेळेतच हे ट्वीट डिलीट केलं.

अमरिंदर सिंग यांची मैत्रीण, आयएसआय आणि पाकिस्तानच्या ड्रोनचीही चौकशी

दरम्यान, पत्रकारांनी गुरुवारी (२२ ऑक्टोबर) सुखजिंदर सिंग यांना अरूसा आलम पाकिस्तानच्या हस्तक आहेत का असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अरूसा आलम यांचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी काय संबंध आहेत हे पोलीस महासंचालकांना तपासण्यास सांगणार असल्याचं म्हटलं. याशिवाय अमरिंदर सिंग मुख्यमंत्री असताना पाकिस्तानमधून आलेल्या ड्रोनचीही चौकशी करणार असल्याचं सांगितलंय.

सोनिया गांधींसोबतचा फोटो पोस्ट करत कॅप्टन अमरिंदर यांच्याकडून प्रत्युत्तर

अमरिंदर सिंग यांनी आपल्यावरील या आरोपांवर तात्काळ प्रत्युत्तर दिलंय. अमरिंदर सिंग यांचे सल्लागार रवीन ठुकराल यांनी अमरिंदर सिंग यांचा हवाला देत एकामागोमाग एक ट्वीट करत हल्ला चढवला. अमरिंदर सिंग म्हणाले, “कॅबिनेटमधील सहकारी म्हणून सुखजिंदर सिंग यांनी कधीही अरूसा यांच्याबाबत तक्रार केल्याचं मला आठवत नाही. अरूसा मागील १६ वर्षांपासून भारत सरकारच्या मंजुरीनुसार भारतात येतात. या काळात NDA आणि UPA सरकारचा देखील पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध होता असं तुम्हाला म्हणायचं आहे का?”

“राज्याची सुरक्षा पणाला लावून आधारहीन आरोपांचा तपास”

“दहशतवादाचा सर्वाधिक धोका असताना आणि सणसुद जवळ आलेले असताना कायदा सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे. मात्र, अशावेळी तुम्ही राज्याची सुरक्षा पणाला लावून पोलीस महासंचालकांना आधारहीन आरोपांचा तपास करण्यात गुंतवत आहात. तुम्ही व्यक्तिगत हल्ले करत आहात. तुम्ही बरगारीमधील पवित्र ग्रंथाची चोरी आणि ड्रग्जप्रकरणी दिलेले मोठमोठे आश्वासनं कधी पूर्ण करणार आहात? पंजाब ही आश्वासनं पूर्ण होण्याची वाट पाहत आहे,” असं म्हणत अमरिंदर सिंग यांनी निशाणा साधला.

अरूसा आलम कोण आहेत?

अरूसा आलम पाकिस्तानच्या संरक्षणविषयक पत्रकार आहेत. त्या अमरिंदर सिंग यांच्या जवळच्या मानल्या जातात. अरूसा आलम यांची अमरिंदर सिंग यांच्यासोबत पहिली भेट २००४ मध्ये झाली. त्यानंतर त्या नेहमीच अमरिंदर सिंग यांच्या घरी येत राहिल्या. असं असलं तरी त्या पटियालामधील राजमहलला कधीही जात नाही.

हेही वाचा : पंजाबसह देशातील ३ राज्यात सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र वाढवल्यावरून वाद, BSF कडून ‘हे’ स्पष्टीकरण

अरूसा २०१७ मध्ये अमरिंदर सिंग यांच्या शपथविधी कार्यक्रमात सहभागी झालेल्या मोजक्या पाहुण्यांपैकी एक होत्या. अरूसा यांचे वडील अकलीन अख्तर यांचा पाकिस्तानच्या राजकारणात चांगला दबदबा आहे. अरूसा यांच्या आईला राणी जनरल असंही म्हटलं जातं. आईच्या प्रभावामुळेच त्या पाकिस्तानच्या सुरक्षा दलांना जवळून समजून घेऊ लागल्या आणि संरक्षण पत्रकारिता करू लागल्या. त्यांचं लग्न झालं असून त्यांना २ मुलं आहेत.