कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठा राजकीय कलह पाहायला मिळाला. त्यांच्यापाठोपाठ ज्यांच्याशी अमरिंदर सिंग यांचे तीव्र मतभेद होते, त्या नवजोत सिंग सिद्धू यांनीही पक्ष प्रदेधाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याची परिस्थिती असतानाच खुद्द कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नीने अर्थात काँग्रेस खासदार परनीत कौर यांनी मात्र काँग्रेस सोडण्यास नकार दिला आहे. “मी काँग्रेस सोडणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका परनीत कौर यांनी घेतली आहे. त्यामुळे या सगळ्या गोंधळात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याप्रमाणेच त्याही काँग्रेसला रामराम करण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या तरी…

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पत्नी परनीत कौर या देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन राजीनामा देतील, असं म्हटलं जात होतं. मात्र, त्यावर खुद्द परनीत कौर यांनीच पडदा टाकला आहे. “मी काँग्रेस पक्षासोबतच राहणार आहे. मी काँग्रेसची खासदार असून त्या पदावर देखील मी कायम राहणार आहे. सध्या तरी काँग्रेस पक्ष सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही”, असं परनीत कौर म्हणाल्या आहेत. दरम्यान, आपल्या भविष्यातील योजनांविषयी बोलणं त्यांनी टाळलं. “मी माझ्या भविष्यातील योजनांविषयी काही बोलणार नाही. पण सध्या तरी पंजाब काँग्रेसमध्ये जे काही घडतंय, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता दु:खी आहे”, असं त्या म्हणाल्या.

परनीत कौर या पतियाला मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेल्या आहेत. अमरिंदर सिंग हे देखील याच लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या ९ विधानसभा मतदारसंघापैकी एक असलेल्या पतियाला शहर मतदारसंघातून निवडून आले आहेत. या नऊपैकी सात मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत.

“मी पंजाबचा माजी मुख्यमंत्री नाही, कृपया…”, भारताचा गोलकीपर वैतागला! ट्वीटरवर केली कळकळीची विनंती

“…म्हणून अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला”

दरम्यान, परनीत कौर यांनी आपले पती कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या निर्णयाचं समर्थनच केलं आहे. काही काँग्रेस नेत्यांनी त्यांचा अपमान केल्याचा देखील दावा परनीत कौर यांनी केला आहे. “काँग्रेसचे देशातील ते एक ज्येष्ठ नेते आहेत. जेव्हा एकापाठोपाठ एक राज्य काँग्रेस गमावत होतं, तेव्हा त्यांनी पंजाबमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणलं. त्यांना अपमानित करण्यात आलं. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. पक्षासाठी ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या नेत्याला अशी वागणूक देणं चुकीचं आहे”, असं त्या म्हणाल्या.

अमरिंदर सिंग यांना केंद्रीय कृषीमंत्रीपद देणार?

दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधवारी भेट घेतल्यानंतर शिरोमणी दलाकडूनही अमरिंदर सिंग यांच्या गळ्यात केंद्रीय कृषीमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केलीय. रिपब्लिक टीव्हीशी बोलताना शिरोमणी दलाचे नेते महेशिंदर सिंग गरेवाल यांनी अमरिंदर सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रीय कृषीमंत्री बनवण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्याचा उल्लेख केलाय. अमरिंदर सिंग यांच्यासारखा वरिष्ठ राजकारणी हा नेहमीच आपले मार्ग स्वत: निवडणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी आहेत. २०२२ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन अमरिंदर सिंग आपलं राजकीय भविष्य ठरवतील असंही त्यांनी म्हटलं आहे. “केंद्रीय गृहमंत्री आणि कॅप्टन (अमरिंदर सिंग) यांच्यादरम्यान काहीतरी समझोता झाल्याची चर्चा मागील वर्षभरापासून राजकीय वर्तुळात आहे. तसेच याच चर्चांनुसार अमरिंदर सिंग यांना भारताचं कृषीमंत्रीही बनवलं जाण्याची शक्यत आहे. तुम्ही राजकारणामध्ये कोणतीही शक्यता नाकारु शकत नाही,” असं गरेवाल यांनी म्हटलं आहे.