पंजाबच्या राजकारणात नुकत्याच घडलेल्या अनेक घडामोडींतून काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातले वाद चर्चेचा विषय ठरले होते. वातावरण काहीसं थंडावताना दिसत असतानाच आता नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नव्या वक्तव्यावरून वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे आज कापूरथला भागातल्या एका सभेला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आपल्या भाषणात सिद्धू म्हणाले, “कॅप्टन म्हणाले की सिद्धूसाठी आता दरवाजे बंद झाले आहेत. पण आज पाहा…ते घरात बसलेत आणि मोदींचे तळवे चाटतायत”.
पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत, कॅबिनेट मंत्री राणा गुरजीत सिंग आणि सुलतानपूर लोधी मतदारसंघाचे आमदार नवतेज चीमा यांच्यात मतभेद झाले होते, तेव्हा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनीही माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि राणा गुरजीत सिंग यांच्यावर निशाणा साधला होता. खरं तर, पंजाबमध्ये सध्या अमरिंदर सिंग यांच्यासोबत सिद्धूची भांडणे सुरू आहेत आणि आता एका रॅलीत सिद्धू आपल्या समर्थकांसमोर राणा गुरजीत सिंग यांची खिल्ली उडवताना दिसले. किंबहुना, स्वतःला ‘गुरु’ म्हणून संबोधत सिद्धू म्हणाले, “त्याने राणा आणि राजांचा काळ संपवला.”
खरे तर सिद्धू नवतेज चीमा यांच्या बाजूने आहेत. सिद्धू यांना विधानसभा निवडणुकीत चीमा सुलतानपूर लोधी येथून तिकीट मिळवायचे आहे, परंतु राणा गुरजीत सिंग यांना त्याच जागेवरून त्यांचा मुलगा राणा इंदर प्रताप सिंग यांना उमेदवारी द्यायची आहे. सिद्धू यांनी चीमा यांच्या समर्थनार्थ रॅली तर काढलीच पण चीमा यांना पुढची १० वर्षे त्यांचा ‘सरदार’ ठेवण्याचे आवाहनही केले.