गेल्या काही महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आले होते. आधी नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी सुरू असलेले वाद, त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, चरणजीतसिंग चन्नी मुख्यमंत्री झाल्यानंतर नवजोतसिंग सिद्धू यांचं नाराजीनाट्य या सगळ्या घडामोडींनंतर आता त्या वादावर अखेर पूर्णविराम लागला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अखेर काँग्रेसच्या सदस्यपदाचा देखील राजीनामा दिला आहे. यासोबतच, त्यांनी आपल्या नव्या पक्षाच्या नावाची देखील घोषणा केली आहे. राजीनामा सादर करताना त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना तब्बल ७ पानांचं पत्रच लिहिलं असून पक्षात आल्यापासून काँग्रेससाठी दिलेल्या योगदानाचा संपूर्ण इतिहासच त्यांनी या पत्रात मांडला आहे.
नवज्योतसिंग सिद्धूंवरही निशाणा
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात आपल्या मनातली व्यथा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. “मी अनेकदा विरोध करूनही आणि पंजाबमधील पक्षाच्या सर्व खासदारांच्या एकत्रित सल्ल्यानंतरदेखील तुम्ही अशा व्यक्तीला पंजाब काँग्रेसचे प्रमुख बनवलं, ज्यांनी जाहीररीत्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा आणि पंतप्रधान इम्रान खान यांची गळाभेट घेतली. नवजोतसिंग सिद्धू यांना तुम्ही निवडलंत. बाजवा आणि इम्रान खान हे सीमेपलीकडून देशात दहशतवादी पाठवण्यासाठी कारणीभूत आहेत. भारतीयांना मारण्यासाठी कारणीभूत आहेत”, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधतानाच अमरिंदर सिंग यांनी गांधी कुटुंबावर देखील नाराजी व्यक्त केली. “तुमच्या (सोनिया गांधी) आणि तुमच्या मुलांच्या (राहुल-प्रियांका गांधी) वर्तनामुळे मी खूप खोलवर दुखावलो गेलो आहे. जेवढं प्रेम मी माझ्या मुलांवर करतो, तेवढंच प्रेम मी त्यांच्यावर देखील करतो. त्यांच्या वडिलांना मी १९५४ सालापासून ओळखत होतो. आम्ही शाळेत एकत्र होतो. त्या गोष्टीला आता जवळपास ६७ वर्ष लोटली आहेत”, असं अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटल आहे.
राज्यासाठी आणि देशाच्या हितासाठी…
“माझं राज्य आणि माझ्या देशाच्या हितासाठी मी काँग्रेसचा राजीनामा सादर करत आहे”, असं देखील अमरिंदर सिंग यांनी नमूद केलं आहे.
अमरिंदर सिंग यांच्या नव्या पक्षाचं नाव असेल…
राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या नव्या पक्षाच्या नावाची देखील घोषणा केली. आपल्या नव्या पक्षाचं नाव ‘पंजाब लोक काँग्रेस’ असेल, असं त्यांनी जाहीर केलं आहे.