पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यापासून राज्यात सुरू झालेलं राजकीय नाट्य अद्याप संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. एकीकडे नवज्योत सिंग सिद्धू आपल्या आक्रमक शैलीमुळे आणि नवनव्या विधानांमुळे रोज नवनवे वाद ओढवून घेत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासाठी ही परिस्थिती नियंत्रणात ठेवणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं आहे. त्यातच काँग्रेसकडून नवज्योत सिंग सिद्धू यांची काँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यावरून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

चरणजीत सिंग चन्नी यांच्याबद्दल वाईट वाटतं!

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्याला चरणजीत सिंग यांच्याबद्दल वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. “मला त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. क्षमा असूनही त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासमोर दुय्यम वागणूक दिली जात आहे. चन्नी आता फक्त नाईट वॉचमन बनूनच राहतील”, असं अमरिंदर सिंग म्हणाले आहेत.

असं कधीही घडलं नाही…

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना प्रदेशाध्यक्षांपेक्षाही दुय्यम दर्जा मिळण्याचा प्रकार याआधी कधीच घडला नाही, असं अमरिंदर सिंग म्हणाले. “कोणत्याही स्वाभिमानी नेत्यानं अशी मानहानी सहन करता कामा नये”, असं सांगताना अमरिंदर सिंग यांनी अप्रत्यक्षपणे चन्नी यांनी जबाबदारी सोडण्याचेच सूतोवाच केल्याचं बोललं जात आहे.

“…म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला”, कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी सांगितलं कारण!

“चरणजीत सिंग चन्नी हे फक्त अनुसूचित जातीची मतं मिळवण्यासाठी शोपीस होते का?” असा सवाल अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केला आहे. “कुणीतरी बालिश मुलाप्रमाणे वागतंय आणि दिवसरात्र नवनव्या मागण्या करतंय, म्हणून तुम्ही त्याच्या सर्व मागण्या मान्य करताय आणि असं करताना चांगलं काम करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांची मानहानी करत आहात. काँग्रेस आता गाळात जात आहे”, असं देखील अमरिंदर सिंग म्हणाले.

Story img Loader