काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इंडिगो विमान वाहतूक कंपनीने हैदराबादला जाणारे आपले विमान कराचीकडे वळवले. ही घटना ताजी असतानाच गो फस्ट एअरलाईन्सची एक कार आणि ईंडिगो विमान यांच्यात होणारा अपघात थोडक्यात टळला आहे. गो फस्ट एअरलाईन्सची कार विमानतळावर उभ्या असलेल्या इंडिगो विमानाच्या थेट खाली गेली. ही कार विमानाच्या समोरच्या चाकाला धडकणार होती, मात्र हा अपघात थोडक्यात टळला. दिल्ली विमानतळावर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सचे ए ३२० हे विमान पटणा येथे जाण्यासाठी काही क्षणात उड्डाण घेणार होते. मात्र त्याआधीच गो फस्ट एअरलाईन्सची एक कार विमानाच्या खाली आली. ही कार विमानाच्या समोरच्या चाकाला धडकणार होती.
या घटनेमध्ये कोणताही जीवितहानी झालेली नाही. मात्र नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या घटनेची चौकशी करणार आहे. या घटनेनंतर कारचालकाला ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याने मद्य प्राशन केलेले आहे का हे जाणून घेण्यासाठी त्याची तपासणी करण्यात आली. मात्र गाडी चालवत त्याने कोणतेही मद्यप्राशन केलेले नव्हते, हे या चाचणीतून समोर आले आहे. ईंडिगो एअरलाईन्सचे हे विमान दिल्लीहून पटणा या शहराकडे उड्डाण घेणार होते. याआधीच ही घटना घडली.