मध्य प्रदेशातील इंदूरजवळील लोधिया कुंड येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली. येथे पुलावर उभी असलेली एक कार अचानक पाण्यात पडली. दरम्यान, या कारमध्ये १२ वर्षांची एक मुलगी बसली होती. गाडी अचानक पुढे सरकली आणि पूलावरून खाली पडली. या घटनेनंतर मुलीला वाचवण्यासाठी वडिलांनीही पाण्यात उडी मारली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले इतर लोकही मदतीसाठी सरसावले. सुदैवाने मुलीचे प्राण वाचले आहेत. मुलीसह वडिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
कारचा हँडब्रेक न लावल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंदूरपासून २० किमी अंतरावर असलेल्या सिमरोलजवळ ही घटना घडली. ही कार पाण्यात पडल्यानंतर कारमधील अल्पवयीन मुलगी प्रचंड घाबरली होती. तिच्यासह घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी मदतीसाठी आरडाओरडा आणि किंकाळ्या मारल्या. हा संपूर्ण प्रकार एका पर्यटकाने आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या दुर्घटनेनंतर बापलेकीला पाण्यात बुडताना पाहून मदतीसाठी इंदूर येथील रहिवाशी असणाऱ्या सुमित मॅथ्यूनेही पाण्यात उडी मारली. त्यानंतर आणखी दोन तरुणही मदतीला धावले. संबंधितांनी प्रथम कारचा दरवाजा उघडला आणि मुलीला पाण्यातून बाहेर काढलं. या अपघातामुळे ती प्रचंड घाबरली होती. तिला किरकोळ दुखापत झाली.
हँडब्रेक न लावल्याने झाला अपघात
कारचा हँडब्रेक न लावल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुखापतग्रस्त मुलीच्या वडिलांनी लोधिया कुंड येथील पुलावर कार उभी केली होती. यावेळी त्यांनी हँडब्रेक लावला नव्हता. यावेळी कार अचानक पुढे सरकली आणि पाण्यात पडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या तरुणांनी प्रसंगावधान दाखवल्याने मुलीचा प्राण वाचला आहे. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.