Karoline Leavitt New Press Secretary Of White House: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत दमदार विजय मिळवत पुनरागम केले आहे. ते पुन्हा एकदा देशाची सूत्रे हाती घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशात त्यांनी आता व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांच्या निवडी सुरू केल्या आहेत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हॉऊसच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून कॅरोलिन लेविट यांची निवड केली आहे.

कॅरोलिन लेविट या अवघ्या २७ वर्षांच्या आहेत आणि याबरोबर त्यांनी व्हाईट हाऊसच्या सर्वात तरुण प्रेस सेक्रेटरी होण्याचा मान मिळवला आहे. कॅरोलिन लेविट यांच्या आधी रोनाल्ड झिगलर हे व्हाईट हाऊसचे सर्वात तरुण प्रेस सेक्रेटरी होते, त्यांना वयाच्या २९ व्या वर्षी रिचर्ड निक्सन यांच्या कार्यकाळात ही जबाबदारी मिळाली होती.

कॅरोलिन लेविट डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेच्याही प्रेस सेक्रेटरी होत्या. प्रचारादरम्यान त्यांनी आक्रमकपणे माध्यमांसमोर ट्रम्प यांची बाजू मांडली होती. ज्यामुळे त्यांना अमेरिकेत ओळख मिळाली. यासाठी ट्रम्प यांनीही लेविट यांचे कौतुक करत त्यांच्याकडे व्हाईट हाऊसची जबाबदारी दिली आहे.

ट्रम्प यांनी लेविट यांच्या कामाचे कौतुक करताना म्हटले की, “कॅरोलिन लेविट यांनी निवडणुकीत राष्ट्रीय प्रेस सेक्रेटरी म्हणून कौतुकास्पद काम केले आहे. त्यामुळे आता लेविट यांची व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी म्हणून घोषणा करताना मला आनंद होत आहे. कॅरोलिन हुशार, कणखर आणि अत्यंत प्रभावी संवादक असल्याचे सिद्ध झाले आहे. मला विश्वास आहे की, त्या व्हाईट हाऊसमध्ये उत्तम काम करतील.”

हे ही पाहा: “आजवर काय केले तेही सांगत नाही अन् पुढे काय करणार ते पण बोलत नाही,” चर्चेतील टीका

कोण आहेत कॅरोलिन लेविट?

मूळच्या न्यू हॅम्पशायरच्या असलेल्या लेविट यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ प्रेसिडेन्शियल कॉरस्पॉन्डन्समध्ये समर इंटर्न म्हणून केली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये केली मॅकेनी यांच्या सहाय्यक प्रेस सेक्रेटरी म्हणून काम केले आहे.

नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. सुरुवातील मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ट्रम्प यांच्यात सामना होणार होता. मात्र, बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर ट्रम्प आणि हॅरिस यांच्यात लढत झाली. त्यामध्ये ट्रम्प यांनी सर्वांना धक्का देत मोठा विजय मिळवला. आता ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.