स्टॉकहोम : कॅरोलिन आर. बेटरेझी, मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस या तिघांना यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. आधी रेणूंना एकत्र आणून त्यांचे विभाजन करण्याची प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे रॉयल स्विडिश अकॅडमीने जाहीर केले.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या स्क्रिप्स रिसर्चमधील संशोधक शार्पलेस यांनी सर्वप्रथम रेणूंना एकत्र जोडून त्यानंतर त्यांचे विभाजन करण्याचा सिद्धांत सर्वप्रथम मांडला. मात्र त्यासाठी योग्य रासायनिक ‘बक्कल’ शोधून काढणे, ही समस्या होती. त्यांची एकमेकांशी सहजगत्या प्रतिक्रिया होणे आवश्यक होते. शार्पलेस यांनी डेन्मार्कच्या कोपेनहेगन विद्यापीठातील मेल्डल यांच्यासह एकत्र विभाजित होऊ शकणाऱ्या पहिल्या रेणूंचा शोध लावला. तर कॅलिफोर्नियाच्या स्टँडफोर्ड विद्यापीठातील बेटरेझी यांनी सजीवांमध्ये ही प्रक्रिया उपयोगात आणण्याची पद्धत शोधून काढल्याचे अकॅडमीने पुरस्काराची घोषणा करताना म्हटले.
सोमवारपासून नोबेल पुरस्कार जाहीर होण्यास सुरूवात झाली. स्वीडनचे संशोधक स्वान्ते पाबो यांना वैद्यकशास्त्राचे तर अॅलन आस्पेक्ट (फ्रान्स), जॉन एफ क्लाऊझर (अमेरिका) आणि अँतॉन झायिलगर (ऑस्ट्रिया) यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. गुरुवारी साहित्यासाठी तर शुक्रवारी शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात येईल. सोमवारी अखेरच्या दिवशी अर्थशास्त्राचा पुरस्कार जाहीर होईल. ९ लाख डॉलर आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून १० डिसेंबरला पुरस्कारांचे वितरण केले जाईल.
कार्य काय?
कर्करोगाच्या गाठींवर असलेल्या ‘ग्लायकॅन’ या काबरेहायट्रेट पॉलिमर्सवर बेटरेझी यांनी संशोधन केले. शार्पलेस आणि मेल्डल यांचे संशोधन सजीव पेशींवर वापरून गाठींचे प्रतिकाश्क्तीपासून संरक्षण करणाऱ्या ‘ग्लायकॅन’ची माहिती मिळवली. यातून नव्या पद्धतीच्या जैविक औषधांची निर्मिती शक्य झाली.
दुसऱ्यांदा सन्मान..
शार्पलेस यांना २००१ सालीही नोबेलने सन्मानित करण्यात आले असून दोन वेळा पारितोषिक जिंकणारे ते पाचवे संशोधक ठरले आहेत. त्यांना २०१९ साली अमेरिकन केमिकल सोसायटीतर्फे देण्यात येणाऱ्या अत्यंत मानाच्या ‘प्रिस्टले पुरस्कारा’नेही गौरवण्यात आले होते.