फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस शहरातील कुर्दिश सामाजाबद्दल वंशभेदी टीका केल्याच्या मुद्द्यावरुन हिंसाचार सुरु झाला आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. शुक्रवारी २३ डिसेंबर रोजी या हिंसाचाराची पहिली ठिणगी पडली. शुक्रवारपासून सुरु असलेला हिंसाचार शहरातील काही भागांमध्ये पसरला असून शनिवारी आणि रविवारीही हा हिंसाचार सुरुच होता. अनेक ठिकाणी समाजकंटकांनी गाड्यांची नासधूस केली आणि त्यांना आगही लावली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला.
शहरातील रिपब्लिक चौकामध्ये एका गाडीची तोफडोड करण्यात आली. समाजकंटकांनी ही गाडी उलटी करुन ती जाळण्याचाही प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. पॅरिसमध्ये पारंपारिक पद्धतीने ज्या ठिकाणी आंदोलन केलं जात त्या ठिकाणी मोर्चा सुरु असतानाच हा हिंसाचार सुरु झाला.
पॅरीस पोलिसांचे प्रमुख लेफ्टनंट नुझेन यांनी अचानक शहरामध्ये हिंसक आंदोलन सुरु झाल्याचं सांगितलं. मात्र हे आंदोलन का सुरु झालं आण त्याचं हिंसाचारामध्ये कसं रुपांतर झालं याबद्दलची माहिती समोर आलेली नाही असं शहराच्या पोलीस प्रमुखांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचार प्रकरणामध्ये शुक्रवारपासून ११ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याने आंदोलकांनी पोलिसांनावर दगडफेक केली. या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या आंदोलनात ३० पोलीस अधिकारी आणि एक आंदोलक जखमी झाला आहे. जवळजवळ दोन तास ही हिंसा सुरु होती.
शेकडो कुर्दिश आंदोलकांबरोबर अनेक नेतेही आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये पॅरिसमधील टेन्थ डिस्ट्रीकचे महापौरही सहभागी झालेले. या आंदोलकांनी झेंडे फडकवतानाच शनिवारच्या हिंसाचारामध्ये मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. “आम्हाला कोणत्याच प्रकारचं संरक्षण दिलं जात नाही. दिवसाढवळ्या पॅरीस शहरामध्ये सहा कुर्दिश आंदोलकांना ठार मारण्यात आलं,” असं आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या ‘सीडीके-एफ’चे प्रवक्ते ब्रिव्हान फिरात यांनी सांगितलं आहे.
शुक्रवारी एका शसस्त्र हल्लेखोराने कुर्दिश संस्कृतिक कार्यालय आणि त्या जवळच्या कॅफेवर अंदाधूंद गोळीबार केला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
हल्लेखोराने आपल्याला परदेशी नागरिकांचा राग येतो असं पोलिसांना सांगितल्याची माहिती एका अधिकाऱ्याने एएफपी या वृत्तंस्थेशी बोलताना दिली. त्यानंतर या व्यक्तीला आरोग्याच्या कारणास्तव कोठडीमधून सोडून देण्यात आलं.
शुक्रवारच्या हा हल्ल्यानंतर हिंसाचार सुरु झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लोक गाड्यांना आग लावताना आणि गाड्यांच्या खिडक्या तोडताना दिसत आहेत. कुर्दिश समाजातील लोक गोळीबारामध्ये मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहचले असताना आणि श्रद्धांजलीसभा म्हणून हा कार्यक्रम होत असताना अचानक हिंसा कशी झाली यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत.