Delhi Assembly Election: आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांच्याविरोधात एका महिलेशी गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका महिलेकडे पाहून आमदारांनी फ्लाईंग किस दिला होता. यानंतर दिल्लीच्या संग्राम विहार पोलीस ठाण्यात आमदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, अशी बातमी एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. महिलेने दावा केला आहे की, आमदारांनी प्रचारादरम्यान फ्लाईंग किस दिला. दिल्ली पोलिसांनी आमदारांवर कलम ११५ (२), ७८, १२७ (२), ३३३ आणि ३ (५) नुसार विनयभंग आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आमदार दिनेश मोहनिया फ्लाईंग किस देत असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मतदानाच्या आधी आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीने पाच लाखांची रोकड गाडीतून नेत असताना त्याला अटक करण्यात आली. मतदानासाठी हा पैसा वाटला जाणार होता, असा आरोप यानिमित्ताने करण्यात येत आहे. तसेच यमुनेचे पाणी विषयुक्त असल्याचे म्हटल्यामुळे ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावरही हरियाणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दरम्यान आज (दि. ५ फेब्रुवारी) दिल्लीत विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. ‘आप’ आणि भाजपामध्ये सत्ता स्थापनेसाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. बोगस मतदान केल्याचा आरोप भाजपा आणि ‘आप’ने एकमेकांवर केला आहे. सलीमपूर आणि कस्तुरबा नगर येथे बोगस मतदान झाल्याचा दावा भाजपाने केला असून काही बुरखाधारी मतदार बोगस मतदान करत असल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे, असे वृत्त पीटीआयने दिले.

कस्तुरबा नगर येथे दोन मतदार फसवणूक करून मतदान करताना आढळले आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तर ग्रेटर कैलाशचे आमदार आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दावा केला की, चिराग दिल्ली येथे मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात येत आहे. तर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपाने पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.

वृद्ध महिलेला केली होती मारहाण

दरम्यान आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांच्याविरोधात कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१६ साली त्यांच्यावर ६० वर्षीय महिलेशी गैरवर्तन करत तिच्या कानाखाली मारल्याचा आरोप करण्यात आला होता. मोहनिया मतदारसंघात फिरत असताना तिने मोहनिया यांना ओळखले नाही. त्यामुळे मोहनिया यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी तिचा हात पिरगळला. मोहनिया यांनी हा प्रकार थांबविण्याऐवजी महिलेच्या कानाखाली लगावली. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मोहनिया यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.