उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १३ जणांनी फसवणूक केल्याचा आरोप एका व्यक्तीनं केला. त्यानुसार कानपूरमधील पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, महिंद्रा कंंपनीकडून परिपत्रक काढत आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
राजेश मिश्रा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. राजेश मिश्रा यांनी मुलगा अपूर्व मिश्रा याला काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार भेट दिली होती. या कारमधून १४ जानेवारी २०२२ ला अपूर्व मित्रांसह लखनऊहून कानपूरला येत होता. पण, धुक्यामुळे कार डिव्हाडरला आदळली. यात अपूर्वचा मृत्यू झाला.
तिरुपती ऑटोमोबाइल्स येथून राजेश मिश्रा यांनी कार खरेदी केली होती. त्यानुसार २९ जानेवारीला राजेश मिश्रा कारसह शोरूमला आले. सीटबेल्ट लावूनही एअरबॅग्स उघडल्या नाहीत. फसवणूक करून कार विकली. कारची तपासणी केली असती, तर मुलाचा मृत्यू झाला नसता, असं राजेश मिश्रा यांनी सांगितलं.
हेही वाचा : चाहते म्हणाले मोहम्मद सिराजला SUV कार गिफ्ट करा, त्यावर आनंद महिंद्रा स्पष्टच बोलले; “आधीच…”
तेव्हा शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी राजेश मिश्रा यांच्याशी वाद घातला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर राजेश मिश्रा यांनी कार शोरूमच्या समोर उभी केली. कंपनीनं कारमध्ये एअरबॅग्स लावले नसल्याचा आरोप मिश्रांनी केला. भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, २८७, ३०४-अ आणि अन्य कलमांखाली आनंद महिंद्रा यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिंद्र कंपनीकडून स्पष्टीकरण
दरम्यान, याप्रकरणावर महिंद्रा कंपनीनं पत्रक काढत म्हटलं, “१८ महिन्याआधी २०२२ मध्ये ही घटना घडली होती. कारमध्ये एअरबॅग नसल्याचा आरोप करण्यात आला. पण, २०२० साली तयार झालेल्या स्कॉर्पिओ एस-९ मध्ये एअरबॅग होते. एअरबॅग खराबही झाले नव्हते.”
“हे प्रकरण सध्य न्यायप्रविष्ट आहे. आम्ही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत. तसेच, त्यांच्या कुटुंबाप्रती पूर्ण सहानुभूती आहे,” असंही महिंद्राने पत्रकात सांगितलं आहे.