शहरातील जकात व पारगमन शुल्क वसुली करणाऱ्या सहकार ग्लोबल या ठेकेदार संस्थेच्या अधिकाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील यांच्याविरुद्ध येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका हद्दीत प्रवेश करणाऱ्या बाहेरगावच्या मालवाहक वाहनांसाठी पूर्वी १०० रुपये असलेले पारगमन शुल्क एक एप्रिलपासून दोनशे रुपये करण्यात आले आहे. वास्तविक स्थानिक वाहनांना या शुल्कातून सूट देण्यात आली असताना जकात नाक्यांवरील कर्मचारी अनेकदा हे शुल्क सरसकट वसूल करीत असतात. त्यावरून यापूर्वी जकात कर्मचारी व स्थानिकांमध्ये अनेकदा बाचाबाचीचे प्रकार घडले आहेत. पालिका प्रशासनाकडेही त्यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी या वसुलीस आळा बसलेला नाही. रविवारी मध्यरात्रीनंतर संदीप पाटील हे टेहरे चौफुलीवरील जकात नाक्यावर गेले असता स्थानिकांकडून पारगमन शुल्क वसुली होत असल्याचा प्रकार त्यांना आढळून आला. त्यावरून तेथील कर्मचारी व त्यांच्यात वादावादी झाली. यानंतर पाटील यांनी पारगमन शुल्काचे जुने पावती पुस्तक मागितले असता तेथील अधिकारी संजोग बागुल यांनी ते देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने पाटील यांनी आपणास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे बागूल यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा