पीटीआय, नवी दिल्ली
‘नीट-यूजी’ पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) गुरुवारी पाटणाच्या ‘एम्स’मधील चार विद्यार्थ्यांची कसून चौकशी केली. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, अशा संशयित विद्यार्थ्यांना सीबीआय आपल्या ताब्यात घेत आहे. चौकशीनंतर या चार विद्यार्थ्यांना सीबीआयने अटक केली आहे. या विद्यार्थ्यांकडून काही धागेदोरे मिळण्याची शक्यता सीबीआयला आहे.
एमबीबीएसच्या तृतीय वर्षाचे तीन आणि दुसऱ्या वर्षातील एका विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आली. या चार विद्यार्थ्यांना वरिष्ठ प्राध्यापकांच्या उपस्थितीत त्यांच्या वसतिगृहाच्या खोल्यांमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तशी माहिती देण्यात त्यांना देण्यात आली आहे. तसेच सीबीआयने त्यांच्या वसतिगृहाच्या खोल्याही सील केल्या आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.सीबीआयने ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चंदन सिंग, राहुल अनंत आणि कुमार शानू हे तृतीय वर्षाचे आहेत आणि करण जैन हा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहेत, असे एम्स पाटणाचे संचालक जी के पॉल यांनी सांगितले.
करोनानंतर जगाला कळले, भारताकडे शांतता, आनंदाचा मार्ग; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
या आधी सीबीआयने पंकज कुमार ऊर्फ आदित्य आणि राजू सिंग या दोघांना अटक केली आहे. पंकज कुमार उर्फ आदित्य, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जमशेदपूर मधील २०१७-बॅचचा सिव्हिल इंजिनीयर असून त्याने हजारीबागमधील एनटीए ट्रंकमधून नीट-यूजी पेपर चोरल्याचा आरोप केल्यानंतर दोन दिवसांनी हे पाऊल पुढे आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बोकारो येथील रहिवासी असलेल्या कुमारला पाटणा येथून अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सीबीआयने हजारीबाग येथून कुमारला पेपर चोरण्यात मदत करणाऱ्या राजू सिंग यालाही अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वैद्याकीय प्रवेश परीक्षेतील कथित अनियमिततेची चौकशी करणाऱ्या सीबीआयने सहा एफआयआर दाखल केले आहेत. बिहारमधील एफआयआर पेपरफुटीसंबंधित आहेत आणि उर्वरित गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची तोतयागिरी आणि फसवणूक करण्याशी संबंधित आहेत.यावर्षी ही परीक्षा ५ मे रोजी देशातील ५७१ शहरांमधील ४,७५० केंद्रांवर घेण्यात आली. २३ लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली होती.