नवी दिल्ली : तिहेरी तलाक ही दुष्ट सामाजिक रूढी असल्याचे मत व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणाले की, देशात तिहेरी तलाकविरोधात सप्टेंबर २०१९ मध्ये कायदा झाल्यापासून या प्रकारांत मोठी घट झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या मासिक मन की बात कार्यक्रमात मोदी म्हणाले की, तिहेरी तलाकसारख्या दुष्ट रूढी आता नष्ट होत चालल्या आहेत. जेव्हापासून तिहेरी तलाकविरोधात कायदा केला, तेव्हापासून हे प्रकार ८० टक्क्यांनी कमी झाले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाच्या आघाडीवर हे सरकारचे यश आहे. 

त्यांनी पुढे सांगितले की, अलीकडील काही काळात सरकारने मातृत्वाची रजा वाढविण्यासारखे निर्णय घेतले आहेत. विवाहासाठीचे किमान वय मुला-मुलींसाठी एकच असावे यासाठी देशात प्रयत्न सुरू असून पुत्र आणि कन्यांना एकसमान अधिकार देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे महिलांचे प्रत्येक क्षेत्रातील योगदान वाढत चालले आहे. 

ते म्हणाले की, सामाजिक मोहिमांचा परिणाम म्हणून आणखी एक मोठा बदल देशात होत आहे.  बेटी बचाओ, बेटी पढाओचे यश लक्षात घ्या. आज देशात मुली आणि मुलांच्या जन्माच्या गुणोत्तरात सुधारणा होत आहे. याच वेळी आपल्या कन्या शाळा सोडणार नाहीत, हे पाहण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे उघडय़ावर शौचाला बसण्याची वेळ आता येत नाही. हे सर्व कमी कालावधीत साध्य करता आले, कारण या बदलाच्या प्रागतिक मोहिमा राबविण्यासाठी महिला स्वत:हून पुढे येत आहेत.

प्राचीन शिल्पांचा ठेवा

भारतातील प्राचीन शिल्पे, मूर्तीची परदेशात तस्करी होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. हा भारताचा सांस्कृतिक ठेवा मायभूमीत परत आणणे हे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. २०१३ पर्यंत अशा १३ मूर्ती भारतात आणल्या गेल्या, तर गेल्या सात वर्षांत अशा अमूल्य २०० मूर्ती यशस्वीपणे परत आणल्याची माहिती त्यांनी दिली. भारताची भावना लक्षात घेता अमेरिका, ब्रिटन, हॉलंड आदी अनेक देशांनी यासाठी भारताला मदत केली, असे ते म्हणाले.  

टांझानियाच्या कलावंतांचा आदर्श

टांझानियाचे लिप सींक कलाकार किली पॉल आणि त्यांची भगिनी नीमा पॉल यांचा उल्लेख करून त्यांनी अलीकडेच प्रजासत्ताक दिनानिमित्त जनगणमन गायल्याची आठवण मोदी यांनी सांगितली. भारतातील वेगवेगळय़ा राज्यांतील मुलांनी याचप्रकारे अन्य राज्यांची गीते गावीत आणि एक भारत- श्रेष्ठ भारत याची प्रचीती द्यावी, असे आवाहन मोदी यांनी केले.

वैज्ञानिकांचा गौरव

करोनाविरोधातील लढय़ात भारतीय वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानाचे मोदी यांनी कौतुक केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cases of triple talaq decreased by 80 percent narendra modi in mann ki baat zws