Cash For Question मुळे चर्चेत आलेल्या आणि वादात सापडलेल्या तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप फेटाळले आहेत. आरोप कुणीही करु शकतो. मात्र ते सिद्ध करण्याची जबाबदारी आणि त्याचे पुरावे देण्याची जबाबदारी ही आरोप करणाऱ्याची किंवा तक्रार करणाऱ्याची असते. माझ्या विरोधात जे प्रतिज्ञापत्र देण्यात आलं आहे ते मी वाचलं आहे. त्यात २ कोटी रुपये मला दिल्याचा काहीही उल्लेख नाही असं म्हणत महुआ मोईत्रांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप फेटाळले आहेत.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत महुआ मोईत्रा म्हणाल्या की मी जर प्रश्न उपस्थित करण्याच्या बदल्यात पैसे घेतले होते तर हे कुठल्या तारखेला घडलं होतं जरा ती तारीखही मला सांगा. तसंच मी पैसे घेतले आहेत याचे पुरावेही सादर करा. दर्शन हिरानंदानी यांनी महुआ मोईत्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडचणीत आणण्यासाठी गौतम अदाणींबाबत प्रश्न विचारण्यासाठी पैसे दिले होते, हा आरोप भाजपा नेते निशिकांत दुबेंनी केला. त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. मात्र आता हे सगळे आरोप महुआ मोईत्रांनी फेटाळून लावले आहेत.
काय म्हणाल्या महुआ मोईत्रा?
महुआ मोईत्रा म्हणाल्या की जे प्रतिज्ञापत्र दिलं गेलं आहे त्यात दर्शन हिरानंदानी यांनीही मला रोख रक्कम दिल्याचा उल्लेख केलेला नाही. माझ्यावर अकारणच २ कोटी रुपये घेतल्याचा आरोप लावला जातो आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे आणि वकील जय अनंत देहद्रई यांना गुरुवारी संसदेच्या समितीने प्रश्न विचारले. समितीने एक दोनदा नाही १४ वेळा विचारलं की तुमच्याकडे तुम्ही जे आरोप करत आहात त्याचा काही पुरावा किंवा काही कागदपत्रं आहेत का? जर मी पैसे घेतले आहेत आणि दर्शन हिरानंदानी हे सरकारी साक्षीदार आहेत तर तातडीने संसदेच्या पटलावर त्यांनी पुरावे ठेवले पाहिजेत. माझ्यावर आरोप करत आहेत त्यांनी पुराव्यानिशी सांगावं मला कधी आणि कुठे पैसे देण्यात आले? असंही महुआ मोईत्रांनी म्हटलं आहे.
३१ ऑक्टोबरला संसदीय समितीपुढे हजर होणार महुआ मोईत्रा
३१ ऑक्टोबरला संसदीय समितीपुढे महुआ मोईत्रा हजर होणार आहेत. त्यांना यासंदर्भातलं समन्स पाठवण्यात आलं आहे. या समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी सांगितलं की समितीने गुरुवारी भाजपा खासदार निशिकांत दुबे आणि वकील जय अनंत देहद्राई यांनी या प्रश्नोत्तरासाठी बोलवलं होतं.
काय आहे हे प्रकरण?
भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी हे म्हटलं आहे की महुआ मोईत्रांविरोधात जे कॅश फॉर क्वेश्चनचे आरोप झाले त्या प्रकरणी त्यांची चौकशी केली जावी. तसंच तातडीच्या प्रभावाने त्यांना संसदेतून निलंबित करण्यात यावं. संसदेत महुआ मोईत्रांनी ६१ प्रश्न व विचारले ज्यापैकी ५० प्रश्न हे अदाणी समूहाशी संबंधित होते असंही दुबे यांनी म्हटलं आहे.