Cash Found at HC Judge Verma’s Residence : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या दिल्ली येथील निवसास्थानाला लागलेल्या आगीनंतर त्यांच्या घरात बेहिशोबी रोकड सापडल्याचा प्रकार उजेडात आला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वर्मा यांच्यावरील आरोपांचा सविस्तर अहवाल सार्वजनिक केला आहे. यादरम्यान न्यायमूर्ती वर्मा यांच्या घराच्या जवळपासच्या परिसरात सफाई कर्मचाऱ्यांना पाचशे रुपयांच्या जळालेल्या नोटांचे तुकडे सापडले आहेत. या नोटांच्या तुकड्यांचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

जवळपासच्या परिसराची स्वच्छता करणारे स्वच्छता कर्मचारी इंद्रजीत यांनी कचरा गोळा करताना ५०० रुपयांच्या नोटांचे जळालेले तुकडे आढळल्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांन काही दिवसांपूर्वीही असेच पैशांचे तुकडे आढळले होते असेही नमूद केले आहे. पण घरात आग कशी लागली याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले.

आम्ही येथे सर्कलमध्ये काम करतो, आम्ही रस्त्यावरून कचरा गोळा करतो. ४-५ दिवसांपूर्वी आम्ही येथे स्वच्छता करताना कचरा गोळा करत होतो तेव्हा आम्हाला ५०० रुपयांच्या नोटेचे १-२ लहान-लहान तुकडे मिळाले… आग कुठे लागली होती आम्हाला माहिती नाही. आमचं काम फक्त कचरा गोळा करण्याचं आहे, असे इंद्रजीत यांनी सांगितले.

आणखी एक स्वच्छता कर्मचारी, सुरेंदर म्हणाले की, “आम्ही या कचरा गाडीबरोबर काम करतो, आम्ही कचरा गोळा करतो. ४-५ दिवस झाले आम्हाला ५०० रूपयांच्या जळालेल्या नोटा सापडल्याला आहे. आम्हाला आजही काही नोटा सापडल्या आहेत…”.

सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या रिपोर्टमध्ये असे दिसून आले की स्टोअररूम म्हणून वापरल्या जाणाऱ्या एका घराच्या आऊटहाऊसमध्ये चार ते पाच पोते भरून जळालेल्या नोटा सापडल्या आहेत. यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा नेमका कुठून आला याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत.

दरम्यान आग लागली तेव्हा न्यायाधीश वर्मा हे त्यांच्या घरात नव्हते आणि त्यांनी आपला या पैशांची काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने जळालेल्या नोटांचा व्हिडीओ देखील सार्वजनिक केला आहे.

२२ मार्च रोजी रात्री उशीरा हा चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे. ज्यामध्ये आग आटोक्यात आणतानाचे फोटो आणि व्हिडीओ आहेत. तसेच यामध्ये दिल्ली उच्च न्यायालायाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी सूचित केले की, स्टोअररूममध्ये जबरदस्तीने प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. यावरून दिसून येते की फक्त न्यायमूर्ती वर्मा यांच्याशी संबंधित व्यक्तींनाच त्यामध्ये प्रवेश होता.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती हा पैसा कुठून आला आणि यामध्ये कोणाचा सहभाग आहे याचा तपास करेल. दरम्यान ही चौकशी सुरू होताच न्यायमूर्ती वर्मा यांना पुढील सूचना येईपर्यंत न्यायालयीन काम न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.