नोटाबंदीच्या एक महिन्यानंतरही बॅंका आणि एटाएमसमोरील रांगा कमी होत नसल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने टी. व्ही. चॅनल आणि वेबसाइट्सद्वारे डिजीटल पेमेंटचे प्रमोशन करण्याचे ठरवले आहे. नोटाबंदीनंतर डिजीटल पेमेंटचे वेगवेगळे उपाय काढणाऱ्या सरकारने  एक नवा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅशलेस पेमेंट करताना जर तुम्हाला काही अडचण येत असतील तर त्यासाठी सरकारने कॅशलेस टोल फ्री हेल्प लाइन नंबर सुरू केला आहे. जर तुम्हाला कॅशलेस पेमेंट करण्यात काही अडचण असेल तर तुम्ही १४४४४ या नंबरवर फोन करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. पुढील आठवड्यामध्ये ही सेवा सुरू होणार आहे.

यासाठी सरकारने नासकॉमची मदत घेतली आहे. जास्तीत जास्त लोकांनी जरी या सेवेचा लाभ घेतला तरी फोन करण्यास अडचण होऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे. संपूर्ण देशासाठी एकच हेल्प लाइन वापरली जाणार आहे. त्यामुळेच या सेवेचा क्रमांक हा पूर्ण देशासाठी एकच असणार आहे. देशात यासाठी कॉल सेंटर्सची स्थापना केली जाईल अशी माहिती नासकॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी म्हटले.

ही हेल्पलाइन लोकांना वेगवेगळ्या स्तरावर मदत करणार आहे. ग्राहकांकडून माहिती घेऊन त्यांच्या समस्येचे समाधान केले जाईल. नेमकी अडचण कोठे आहे विचारुन त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. जसे की फोनमध्ये काय फीचर्स आहेत, आधारकार्ड नंबर आणि बॅंकेचे अकाउंट या स्तरावर त्यांची मदत केली जाईल.

लोकांच्या समस्यांचे समाधान व्हावे याकरिता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘डीजीशाला’ हे चॅनेल सुरू केले आहे. दूरदर्शनची डीटीएच सेवा घेतल्यास त्यावर हे चॅनल दिसते तर कॅशलेस इंडिया ही वेबसाइट देखील सरकारने सुरू केली आहे. त्या वेबसाइटद्वारे देखील कॅशलेस पेमेंटबद्दल ज्ञान दिले जाते.

आठ नोव्हेंबर नंतर देशामध्ये कॅशलेस पेमेंटचे ४०० ते १००० टक्क्यांनी वाढल्याचे माहिती आणि विधी मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले आहे. हेल्पलाइन सेवा कधीपर्यंत सुरू होईल असे विचारले असता पुढील आठवड्याच्या शेवटीला सुरू होईल असे उत्तर चंद्रशेखर यांनी दिले.

एकदा का डिजीटल पेमेंटचे मार्ग लोकांनी स्वीकारायला सुरुवात केली की त्यानंतर हेल्पलाइनचाही उपयोग लोकांना होईल. असे चंद्रशेखर म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cashless payment nasscom digital payment chandrashekhar ravishankar prasad