निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे सक्रिय राजकारणात उतरले आहेत. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणूक रणनीतीचे काम केल्यानंतर त्यांनी नितीश कुमार, ममता बॅनर्जी अशा विविध नेत्यांसह काम करत असताना त्यांना त्या त्या राज्यात विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी नितीश कुमार यांच्या राजकीय निर्णयावर टीका केली. तसेच इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भारतीय राजकारणावर सविस्तर भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले, “जातीआधारीत राजकारणाला मतदार फार महत्त्व देत नाहीत. जात हा महत्त्वाचा विषय असला तरी भारतीय राजकारणाचा तो एकमेव कळीचा मुद्दा नाही.”
केवळ सत्ताधारी आमदारांनाच विकासनिधी; मुंबई महापालिकेचा अजब कारभार, माहिती अधिकारात वास्तव उजेडात
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर म्हणाले, जातीआधारीत राजकारणाला सामान्य लोक फार प्रतिसाद देत नाहीत. बिहारमधील जातीआधारीत सर्वेक्षणाला आधार मानून काँग्रेसकडून देशव्यापी जातीनिहाय सर्वेक्षणाची मागणी केली आहे, त्यावर प्रश्न विचारला असताना प्रशांत किशोर यांनी ही प्रतिक्रिया दिली. या मुद्दयावर स्पष्टीकरण देत असताना प्रशांत किशोर म्हणाले की, राजकारणात एखादा मुद्दा एकदाच चालतो. तो मुद्दा वारंवार उगाळता येत नाही. जातीआधारीत राजकारणाचा मुद्दा मंडल आयोगाच्या वेळी गाजला, पण आता त्याला फार महत्त्व मिळणार नाही.
नितीश कुमार यांनी बिहारमध्ये जातीनिहाय सर्वेक्षण केले. पण या विषयावर बिहारमध्ये आपल्याला मतदान मिळणार नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असेही प्रशांत किशोर म्हणाले.
“लोकसभेसाठी भाजपाचे दोन पॅटर्न; एक मनसुखभाई, दुसरा चंदीगड”, संजय राऊतांचं सूचक विधान!
प्रशांत किशोर यांनी पुढे सांगितले की, उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यात जातीआधारीत राजकारणाची अधिक चर्चा होते. पण तिथे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करतात. या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जात पाहून कुणीही मतदान करत नाही. तर त्यांचे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व पाहून त्यांना मतदान होते. “मतदार भाजपाला नाही तर पंतप्रधान मोदींना मतदान करतात. फक्त मोदींची जात पाहून किती लोक मतदान करत असतील? मोदी हे स्वयंभू नेते आहेत, असे अनेकांचे मत आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी हे घराणेशाहीचे प्रतीक असल्याची मतदारांची भावना आहे. मोदी प्रामाणिक तर काँग्रेस भ्रष्ट असल्याचा समज आहे. मोदी मेहनती, निर्णायक आणि भारताला गौरव प्राप्त करून देणारे नेते आहेत, अशी सामान्यांची भावना आहे”, असेही प्रशांत किशोर म्हणाले.