पीटीआय, पाटणा
बिहारमध्ये वैशाली जिल्ह्यातून शनिवारपासून जातनिहाय जनगणनेला सुरुवात करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या जातनिहाय जनगणनेबाबत सांगितले की, केंद्र सरकार त्यासाठी तयार नसताना राज्य सरकार आपल्या स्तरावर अशा प्रकारे जनगणना करत आहे.आपल्या समाधान यात्रेचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री वैशाली जिल्ह्यातील गोरौल गटांतर्गत हरसेर गावात मनोज पासवान यांच्या घरी पोहोचले. पासवान यांच्या घरातून जातनिहाय जनगणनेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी नितीशकुमार यांनी मनोज पासवान आणि जातनिहाय मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार यांनी सांगितले, की या जनगणनेचे काम चांगले सुरू झाले आहे. आपण स्वत: ते पाहिले आणि प्रगणकांना सर्व काही व्यवस्थित नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीचे घर येथे असेल मात्र ती राज्याबाहेर राहत असेल तर त्याची माहिती घेण्याची सूचना देण्यात आली आहे. सर्व पक्षांच्या सहमतीने जातनिहाय जनगणनेचे काम सुरू झाले आहे.
आर्थिक स्थितीचीही नोंद
नीतीशकुमार यांनी सांगितले की, जातीच्या गणनेसह संबंधितांच्या आर्थिक स्थितीचाही आम्ही अभ्यास करत आहोत. जेणेकरून समाजात गरिबांची संख्या समजू शकेल. त्यांच्या विकासासाठी नेमके काय करावे, हे कळण्यास मदत होईल. जातीच्या गणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल प्रकाशित केला जाईल. त्यातील आकडेवारीनुसार पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल. जनगणनेच्या अहवालाची एक प्रतही केंद्राला पाठवण्यात येईल.