भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली विभागाने सोमवारी आम आदमी पार्टीच्या आमदाराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आपचे आमदार गुलाब सिंह यादव यांचा हा व्हिडीओ असून व्हिडीओत यादव यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचं दिसत आहे. राजधानी दिल्लीमधील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीमध्ये हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपाशी संबंधित ट्विटर हॅण्डल्सबरोबर इतरही ट्विटर हॅण्डलवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये सिंह हे कार्यकर्त्यांशी वाद घालताना दिसत आहेत. या वादाचं रुपांतर हाणामारीत होतं आणि कार्यकर्ते आमदाराला धक्काबुक्की करुन कार्यालयाबाहेर काढतात. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी आमदाराचा पाठलाग केल्याचंही ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. आपला जीव वाचवण्यासाठी आमदाराला पोलीस स्थानकामध्ये आश्रय घ्यावा लागला.
भाजपाने ट्विटरवरुन हा व्हिडीओ शेअर करताना सिंह यांनी पैसे घेऊन दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तिकीटं वाटल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. “आपच्या आमदाराला मारहाण! आम आदमी पार्टीचे आमदार गुलाब सिंह यादव यांना आपच्याच कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तिकीटांचा व्यवहार करत असल्याच्या रागातून मारहाण केली. केजरीवालजी अशाचप्रकारे आपच्या सर्व आमदारांचा नंबर लागेल,” असं दिल्ली भाजपाने ट्विट केलं आहे.
भाजपाच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राष्ट्रीय प्रवक्ते सम्बीत पात्रा, तेजेंदर सिंग बग्गा आणि इतर नेत्यांचा समावेश आहे.
या प्रकरणासंदर्भात दिल्ली पोलिसांनी एक पत्रक जारी केलं आहे. “आमदार गुलाब सिंह यादव यांना मारहाण झाल्याची माहिती आज रात्री आठच्या सुमारास मिळाली. तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरुन हा वाद झाला होता. या वादामधूनच आमदार गुलाब सिंह यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या प्रकरणासंदर्भात कायदेशीर कारवाई सुरु आहे,” असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.
दिल्लीमध्ये महानगरपालिकेची निवडणूक १ डिसेंबर आणि ४ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. २५० वॉर्डमध्ये ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ७ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.