अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन सिमेला लागून असलेल्या अनवाज जिल्ह्यातील नागरिकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये चिनी लष्कराच्या माध्यमातून सीमेवर सुरु असणाऱ्या बांधकामाची दृष्य समोर आली आहेत. या व्हिडीओमध्ये चीनच्या पिपल्स रिपब्लिक आर्मीतील सैनिक आणि बांधकामासाठी वापरली जाणारी मोठी वाहने दिसत आहेत. चालागम येथील हादिगरा-डेल्टा सिक्स या भारतीय हद्दीत असणाऱ्या लष्कराच्या चेक पोस्टजवळून हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याचा दावा केला जातोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामान्यपणे या ठिकाणी जाण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागतो. चालागम हे भारत-चीन सीमेजवळील अरुणाचलजवळच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला म्हणजेच एलएसीला लागून असलेलं शेवटचं ठिकाण आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण : पँगाँग तलावावर चीनने बांधला पूल; भारतासाठी याचा नेमका अर्थ काय?
‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार ११ ऑगस्ट २०२२ रोजी हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेला लागून असलेल्या शी योमी जिल्ह्यातील माचुखा गावातील स्थानिकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या बाजूने ज्या वेगाने रस्ते बांधणी आणि इतर कामं केली जात आहेत ते चिंतेत टाकणार असल्याचं या गावातील लोकांचं म्हणणं आहे. या गावातील लोकांच्या दाव्यानुसार त्यांच्या पूर्वजांनी अगदी तिबेटलाही भेट दिली होती. १९६२ च्या भारत चीन युद्धाआधी तिबेटमधील प्रांतातील लोकांसोबत देवाण-घेवाण पद्धतीने मीठ, तांदूळ, दागिण्यांचा व्यापार व्हायचा असं हे गावकरी सांगतात.
“आत भारतीय लष्कर कोणालाही सीमेजवळ जाऊ देत नाही,” असं एका गावकाऱ्याने सांगितलं. मागील अनेक दशकांपासून सीमेवरील महत्वाची चेक पोस्ट असणाऱ्या या गावाला आलो या मुख्य शहराशी जोडणार एकच रस्ता आहे. त्यामुळेच आता चीनने सुरु केलेल्या या बांधकामामुळे स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.
“आपली बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही गोगलगायीच्या वेगाने काम करतेय. मात्र दुसरीकडे चीनने या भागात चार पदरी रस्ता बांधला आहे. माचुखा गावामध्ये शाळा आणि रुग्णालयांसारख्या मूलभूत सुविधाही नाहीत. फारच कमी संख्येने या प्रांतामध्ये डॉक्टर्स उपलब्ध आहेत. शाळांमध्ये शिक्षक नाहीत. येथे जवळपास उच्च शिक्षणाची सोय नसल्याने आमची मुलं दुसऱ्या शहरांमध्ये स्थलांतरीत झाली आहेत,” असंही स्थानिक सांगतात.
चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) उत्तर लडाखमध्ये पँगाँग तलावावर पूल बांधत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यात आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळही चीनने कुरघोडी करण्याच्या उद्देशाने बांधकाम सुरु केल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी असणाऱ्या प्लॅनेट लॅब पीबीसीने उपग्रहांच्या माध्यमातून काढलेल्या फोटोंमध्ये पँगाँग तलावावरील पुलाचं बांधकाम सुरु असल्याचं दिसत आहे. हे फोटो १५ ऑगस्ट रोजी काढण्यात आले आहेत. या पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मी म्हणजेच पीएलएच्या लष्करी तुकड्यांबरोबरच मोठ्या आकाराची लष्करी वहाने, लष्करी साहित्य आणि फौजफाटा या तलावाच्या उत्तरेला आणि दक्षिणेला सहज पोहचवता येईल.