केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणातील आरोपी व्यापारी अमनदीप सिंग धल्ल यांच्याकडून पाच कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली.
ईडीच्या तक्रारीवरून सीबीआयने ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री आणि उच्च विभागीय लिपिक नितेश कोहर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, अटक करण्यात आलेला व्यापारी अमनदीप सिंग धल्ल, गुरुग्रामचे रहिवासी बिरेंदर पाल सिंग, चार्टर्ड अकाउंटंट प्रवीण कुमार वत्स, क्लेरिजेस हॉटेलचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.
ईडीच्या तक्रारीनुसार, अमनदीप सिंग धल्ल आणि बिरेंदर पाल सिंग यांनी दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यातून सुटका व्हावी, यासाठी डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान प्रवीण वत्स यांना पाच कोटी रुपये दिले होते.
ईडीला दिलेल्या जबाबात प्रवीण वत्स यांनी सांगितलं की, दीपक सांगवान यांनी अमनदीप धल्ल यांना काही रकमेच्या बदल्यात अटकेपासून संरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. सांगवान यांनी डिसेंबर २०२२ मध्ये ईडीचे अधिकारी पवन खत्री यांच्याशी वत्स यांची ओळख करून दिली.
प्रवीण वत्स यांनी अमनदीप धल्ल यांच्याकडून डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत तीन कोटी रुपये घेतले. यानंतर दीपक सांगवान यांनी वत्स यांना सांगितलं की आणखी दोन कोटी रुपये दिले तर, अमनदीप सिंग धल्ल यांना आरोपींच्या यादीतून मुक्त केले जाऊ शकते. प्रवीण वत्स यांनी ही बाब अमनदीप धल्ल यांना सांगितली. त्यांनी प्रस्ताव मान्य केल्यानंतर वत्स यांनी धल्ल यांच्याकडून आणखी दोन कोटी रुपये घेतले.
प्रवीण वत्स यांनी ईडीला सांगितलं की, अमनदीप सिंग धल्ल यांच्या वडिलांकडून मिळालेल्या रकमेपैकी ५० लाख रुपये दीपक सांगवान आणि पवन खत्री यांना आगाऊ रक्कम म्हणून दिले होते. तथापि, सांगवान यांनी आश्वासन दिल्यानंतरही, अमनदीप धल्ल यांना ईडीने १ मार्च २०२३ रोजी अटक केली.
दीपक सांगवान यांनी ईडीला दिलेल्या जबाबात सांगितलं की, धल्ल यांच्या कुटुंबाकडून घेतलेले पैसे परत करण्यासंदर्भात जूनमध्ये प्रवीण वत्स यांची भेट घेतली होती. अशा काही बैठकांमध्ये ईडीचे दोन अधिकारी पवन खत्री आणि नितेश कोहर हेही उपस्थित होते.
यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि संशयित अधिकाऱ्यांसह या प्रकरणातील आरोपींच्या निवासस्थानाची झडती घेतली. यावेळी ईडीने प्रवीण वत्स यांच्या घरातून २.१९ कोटी रुपये रोख रक्कम आणि १.९४ कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने जप्त केले. तसेच त्यांच्या बँक खात्यात २.६२ कोटी रुपये होते. ईडीने प्रवीण वत्सच्या घरातून दोन आलिशान कारही जप्त केल्या. ईडीच्या सांगण्यावरून एफआयआर दाखल केल्यानंतर सीबीआयने आरोपींशी संबंधित इतर ठिकाणांचीही झडती घेतली.