दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनिष सिसोदिया यांना अटक केली आहे. सिसोदिया यांना सोमवारी (२७ फेब्रवारी) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९ तासांच्या चौकशीनंतर अटकेची कारवाई

मनिष सिसोदिया यांची आज मागील नऊ तासांपासून सीबीआयतर्फे चौकशी केली जात होती. या चौकशीत सिसोदिया यांना अनेक प्रश्न विचारल्याचे म्हटले जात आहे. या ९ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. सिसोदिया यांनी याआधीच त्यांच्या अटकेची शक्यता असल्याचे म्हटले होते. तसेच मी सात ते आठ महिन्यांसाठी तुरुंगात जाण्यास तयार आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

कायदा, सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मोठा फौजफाटा

मनिष सिसोदिया यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. सिसोदिया यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी सिसोदिया यांच्या निवासस्थानी तसेच सीबीआय कार्यालयाच्या आवारात मोठा बंदोबस्त ठेवला होता. सिसोदिया चौकशीसाठी गेल्यानंतर आप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

नेमकं प्रकरण काय?

गेल्यावर्षी १७ नोव्हेंबरला दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. या धोरणामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल आणि मद्य माफियांवर अंकुश बसेल, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या धोरणाअंतर्गत सर्व सरकारी आणि खासगी दारूची दुकानं बंद करून नवीन निविदा जारी करण्यात आल्या होत्या. या अगोदर दिल्लीत ७२० दारूची दुकाने होती. त्यापैकी २६० खासगी दुकाने होती. मात्र, नवीन धोरणानंतर सर्व दुकाने खासगी व्यवसायिकांच्या ताब्यात गेली. यावर दिल्लीच्या उपराज्यपालांनी आक्षेप घेतला होता. हे धोरण राबवताना गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

आम्ही सिसोदिया यांच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ- अरविंद केजरीवाल

दरम्यान, सिसोदिया यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता, दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांच्या कुटुंबाची आम्ही काळजी घेऊ, असे आश्वासन दिले आहे. सिसोदिया यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi arrests delhi deputy cm manish sisodia in connection of liquor policy case prd