नवी दिल्ली : ‘सीबीआय’ने एक मुक्त पत्रकार विवेक रघुवंशी आणि नौदलाचा माजी वरिष्ठ अधिकारी (कमांडर) आशिष पाठक या दोघांना संरक्षण क्षेत्राशी संबंधित संवेदनशील माहिती बेकायदा गोळा करून ती परदेशी गुप्तचर संस्थांना दिल्याप्रकरणी अटक केल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. रघुवंशी आणि पाठक यांना ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

मुक्त पत्रकार विवेक रघुवंशींविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर ‘सीबीआय’ने मंगळवारी त्याच्याशी संबंधित परिसराची झडती घेतली. संरक्षण आणि रणनीतीसंदर्भातील अमेरिकन संकेतस्थळाचा भारताचा वार्ताहर म्हणून रघुवंशीचे नाव या संकेतस्थळावर सूचिबद्ध आहे. ‘सीबीआय’ने रघुवंशीच्या जयपूर आणि दिल्लीतील निकटवर्तीयांच्या चौकशीसाठी १२ ठिकाणी शोध मोहीम राबवली. ‘सीबीआय’ने रघुवंशी माजी नौदल अधिकारी पाठकविरुद्ध गोपनीयता कायद्याचे कलम ३ (हेरगिरी) आणि भारतीय दंड संहितेच्या ‘कलम १२०-ब’नुसार (गुन्हेगारी कट) गुन्हा दाखल केला आहे. झडतीदरम्यान अनेक संवेदनशील कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, ती कायदेशीर छाननीसाठी संबंधितांकडे पाठवली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader