सन २००४ मधील कथित पोलीस चकमकीत इशरत जहाँच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी गुजरातचे पोलीस अधिकारी जी. एल. सिंघल यांना केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) अटक केली आहे.
मूळचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असलेले सिंघल हे गुन्हा अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस उपायुक्त होते. त्यांना अहमदाबाद येथे अटक करण्यात आली. त्यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयांमध्ये शोधसत्र सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्याच्या गुन्हे नोंदणी विभागात सिंघल हे पोलीस अधीक्षक असून संबंधित पोलीस चकमकीत त्यांचा सक्रिय सहभाग होता, असे सीबीआयच्या प्राथमिक आरोपपत्रात म्हटले आहे. ही चकमक बनावट असल्याचे नंतर सिद्ध झाले होते. १५ जून २००४ रोजी अहमदाबाद आणि गांधीनगरदरम्यानच्या एका निर्मनुष्य रस्त्यावर झालेल्या या चकमकीत इशरत जहाँ हिच्यासह जावेद शेख, झीशान जोहर आणि अमजद अली राणा हे अन्य तिघे जण ठार झाले होते.या प्रकरणी इशरत जहाँच्या आईने तक्रार केल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने एक विशेष तपासणी पथक नेमून या चकमकीचा तपास करण्यास सांगितले होते. या पथकाने केलेल्या तपासानंतर सदर चकमक बनावट असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यानंतर उच्च न्यायालयाने हे प्रकरण पुढील तपासासाठी सीबीआयकडे सुपूर्द केले आणि सध्या त्यावर सीबीआयचीच देखरेख आहे. त्याच संदर्भात सीबीआयने सिंघल यांना अटक केली असून या तपासकामाची प्रगती कोठवर आली, याचा अहवाल १५ मार्चपर्यंत सादर करावा, असा आदेश न्यायालयाने सीबीआयला दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा