अमित तिवारीने ९०० इमेल हॅक केल्याचे उघड
जागतिक सहकार्याने हॅकर्सविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत गाझियाबाद, मुंबई, पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले असून त्यात पुण्यातील एका हॅकरला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) या चौकशी संस्थेने दिलेल्या माहितीच्या आधारे अमित विक्रम तिवारी याला अटक करण्यात आली असून त्याने माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन केले आहे. तो वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्याने जगभरात किमान ९०० इमेल हॅक केले असून त्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली आहे.
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, तीस वर्षे वयाचा तिवारी हा डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट हायरहॅकर डॉट नेट व डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट अॅनॉनिमिटी डॉट कॉम या दोन संकेतस्थळांच्या माध्यमातून तो त्याच्या ग्राहकांसाठी काम करीत होता. अमेरिकेतील दोन सव्र्हरकडून तो सेवा घेत होता व २५० ते ५०० अमेरिकी डॉलरच्या बदल्यात इमेल अकाउंटचे पासवर्डही देत होता. वेस्टर्न युनियन व पेपाल मार्फत तो आर्थिक व्यवहार करीत होता. प्राथमिक जाबजबाबानुसार तिवारी याने फेब्रुवारी २०११ ते २०१३ दरम्यान ९०० इमेल अकाउंट हॅक केले असून त्यात १७१ भारतीय इमेल खातेदारांचा समावेश आहे. यात काही व्यक्ती व संस्था आहेत. इंडियम प्रीमियर लीगशी संबंधित लोकांनीही तिवारीशी आर्थिक व्यवहारांसाठी संपर्क साधला होता पण देण्याघेण्यावरून ते जमले नव्हते. एफबीआयने दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने प्राथमिक चौकशी करून तिवारीला शोधून काढले. त्याला दहा वर्षांंपूर्वी मुंबई पोलिसांनी क्रेडिट कार्ड घोटाळ्यात अटक केली होती. प्राथमिक पुराव्यांच्या आधारे त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ सी अन्वये हॅकिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने शुक्रवारी मुंबई, पुणे, गाझियाबाद येथे छापे टाकले. अशाच प्रकारची कारवाई चीन, रोमानिया व अमेरिकेत संबंधित संस्थांनी केली आहे.
सीएनएनची सोशल मीडिया अकाउंट हॅक
वॉशिंग्टन : सीरियाच्या ‘इलेक्ट्रॉनिक’ सैन्याने अमेरिकेतील प्रसिद्ध प्रसारण कंपनी असलेल्या सीएनएनची सोशल मीडियावरील अकाउंटस् हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. सीएनएनचे फेसबुकवरील मुख्य पान, ट्विटरवरील मुख्य पान आणि ‘द सिच्युएशन रूम’ व ‘क्रॉस फासर’ हे ब्लॉग हॅक झाले असल्याचे वृत्तवाहिनीतर्फे स्पष्ट करण्यात आले. ‘सीरियाचे इलेक्ट्रॉनिक सैन्य इथे आहे.. आमच्याविरोधातील सर्व अहवाल तद्दन खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत’, असा संदेश सीएनएनच्या ट्विटर अकाउंटवर दिसत होता.