नीट-यूजी पेपर लीक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीआयने आणखी तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये पेपर लीक प्रकरणातील मुख्य सुत्रधार शशीकुमार पासवानचादेखील समावेश आहे. तर इतर दोन जण एमबीबीएसचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – UGC NET पेपर लीक प्रकरण : पुराव्याशी छेडछाड झाल्याचं ‘सीबीआय’च्या तपासात उघड

सीबीआयकडून तिघांना अटक

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सीबीआयने अटक केलेले दोन्ही विद्यार्थी हे राजस्थानच्या भरतपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. कुमार मंगलम बिश्नोई आणि दिपेंद्र कुमार, अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यापैकी कुमार मंगलम बिश्नोई हा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहेत, तर दिपेंद्र कुमार प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. हे तिन्ही जण पेपर सोडवण्यासाठी ५ मे रोजी सकाळी हजारीबागेत उपस्थित होते, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे.

यापूर्वी अनेकांना अटक

महत्त्वाचे म्हणजे नीट पेपर फुटीप्रकरणी सीबीआयने यापूर्वी पटना एम्समधील एमबीबीएसच्या चार विद्यार्थ्यांना अटक केली होती. तसेच एनआयटी जमशेदपूर येथील एका अभियंत्याला देखील अटक करण्यात आली होती. याशिवाय झारखंडमधील रांची येथून सुरभी कुमारी या एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीलादेखील ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता सीबीआयने तिघांना अटक केली आहे.

हेही वाचा – ‘सीबीआय’वर केंद्र सरकारचेच नियंत्रण; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा; पश्चिम बंगाल सरकारची याचिका दाखलयोग्य

बिहारमध्ये सहा गुन्हे दाखल

दरम्यान, या नीट परीक्षेतील गैरप्रकारांबाबत सीबीआय तपास करत असून आतापर्यंत बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून एकट्या बिहारमध्ये सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi arrests mastermind and two medical students in neet ug paper leak case spb