देशातील बँकांना चुना लावून परदेशात पळालेल्या घोटाळेबाजांवर वचक निर्माण करणाऱ्या फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८’ अंतर्गत केंद्रीय अन्वेषण विभागाला मोठे यश मिळाले आहे. नऊ वर्षांपूर्वी काही बँकांना गंडा घालून बहारिन येथे पळालेल्या मोहम्मद याह्या (वय ४७) या घोटाळेबाजाला सीबीआयने अटक केली आहे. मोहम्मदला बहारिनमधील यंत्रणांनी अटक केली होती. तिथूनच सीबीआयने मोहम्मदला ताब्यात घेत भारतात परत आणले.
बेंगळुरुतील काही बँकांना मोहम्मदने २००३ मध्ये चुना लावला होता. या बँकांना ४६ लाख रुपयांचा गंडा घालून तो परदेशात पळून गेला. याप्रकरणी सीबीआयने २००९ मध्ये तपासाला सुरुवात केली. सखोल तपास केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणात कोर्टात आरोपपत्र दाखल केले आणि न्यायालयानेही त्याला फरार जाहीर केले.गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे अशा विविध कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर सीबीआयने इंटरपोलला मोहम्मदविरोधात रेड कॉर्नर नोटीसची विनंती केली होती. इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. या आधारे बहारिनमधील तपास यंत्रणांनी मोहम्मदला ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच सीबीआयच्या पथकाने बहारिनमधील तपास यंत्रणांशी संपर्क साधला. अखेर सीबीआयला मोहम्मदला भारतात परत आणण्यात यश आले आहे. या कायद्याअंतर्गत सीबीआयला मिळालेले हे पहिलेच यश आहे.
भारत सरकारमधील वरिष्ठ अधिकारी बहारिनच्या संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. शुक्रवारी सीबीआयचे पथक मोहम्मदसह दिल्ली विमानतळावर पोहोचले. तेथून पुढील चौकशीसाठी मोहम्मदला बेंगळुरू येथे नेण्यात आल्याची माहिती मिळते.
फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८ कायदा नेमका काय?
गुन्हा केलेले असे गुन्हेगार ज्यांनी कायदेशीर व न्यायालयीन कारवाईपासून वाचण्यासाठी देशाबाहेर पलायन केले आहे व देशात परत यायचे नाकारत आहेत अशांना ‘फरारी आर्थिक गुन्हेगार’ म्हणण्यात येते. दोष सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात येईल व त्याच्या देशातील व परदेशातील मालमत्ता केंद्र शासनाकडून जप्त करण्यात येतील.