नवी दिल्ली : देशभरातील ट्रॅव्हल एजंटनी विद्यार्थी व्हिसाचा गैरवापर करून रशियामध्ये जाणाऱ्या भारतीयांची फसवणूक केली आणि अखेरीस त्यांना युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामध्ये सहभागी होण्यास भाग पाडले असा धक्कादायक प्रकार केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासामध्ये आढळून आला आहे. यासाठी तुलनेने फारशी प्रसिद्ध नसलेली खासगी विद्यापीठे, शुल्कामध्ये सवलत, व्हिसाच्या मुदतीत वाढ अशा आमिषांचा वापर करण्यात आला. दिल्ली, मुंबई, अंबाला, चंडीगड, मदुराई, तिरुवअनंतपुरम आणि चेन्नई या सात शहरांमधील जवळपास १५ ठिकाणी शोध मोहीम राबवल्यानंतर सीबीआयच्या हाती यासंबंधी माहिती लागली आहे. या ठिकाणी असलेले विविध एजंट, तसेच रशियामधील तीन एजंट, या सर्वांनी मिळून भारतीय तरुणांची, विशेषत: विद्यार्थ्यांची फसवणूक केली. दिल्लीमधील एका एजंटने विद्यार्थी व्हिसावर १८० जणांना रशियाला पाठवल्याचे आढळले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> प्राप्तिकर लवादाचा काँग्रेसला धक्का

रशिया-युक्रेन युद्धामध्ये दोन भारतीय तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर यासंबंधी तपास सुरू करण्यात आला. मृत तरुणांपैकी एकजण गुजरातमधील तर दुसरा तेलंगणातील होता. या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एक निवेदन प्रसृत केले. ‘‘अनेक भारतीय नागरिकांना फसवून रशियाच्या लष्करासाठी सहाय्यक कर्मचारी म्हणून काम करण्यास भाग पाडले असून आम्ही हा मुद्दा रशियाच्या अधिकाऱ्यांकडे गांभीर्याने उपस्थित केला असून त्यांची लवकर सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय प्रयत्न करत आहे,’’ असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले. या प्रकरणात अडकलेल्या तरुणांना खोटी आश्वासने देऊन त्यांना फसवणाऱ्या एजंट आणि संशयितांविरोधात कठोर कारवाई सुरू केल्याची माहितीही जयस्वाल यांनी दिली. सीबीआयने गुरुवारी मोठे मानवी तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त केले असल्याचेही ते म्हणाले. अनेक एजंटविरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi busts human trafficking network taking indians to russia ukraine war zws