द्रविड मुन्नेत्र कळघमने केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारचा पाठिंबा काढल्याला दोन दिवस होत असतानाच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांचा मुलगा आणि पक्षाचे नेते एम. के. स्टॅलिन यांच्या निवासस्थानी छापा टाकला. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केल्यावर सीबीआयने तातडीने आपली कार्यवाही थांबविली. स्टॅलिन यांनी त्यांच्याकडील लिमोझिनचा कर चुकवल्याच्या आरोपावरून त्यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे.
राजकीय हेतूनेच सीबीआयने माझ्या निवासस्थानी छापा टाकल्याचा आरोप स्टॅलिन यांनी पत्रकारांकडे केला. ते म्हणाले, या प्रकरणी आम्ही न्यायालयीन लढा देत आहोत. त्याचवेळी अशा पद्धतीने छापा का टाकण्यात आला, हे समजलेले नाही.
स्टॅलिन यांच्या निवासस्थानी टाकलेला छापा योग्य नसल्याचे मत चिदंबरम यांनी व्यक्त केले. माझे म्हणणे मी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे पोहोचविले आहे. गैरसमजुतीतून ही कारवाई झालेली असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या नाराजीनंतर लगेचच सीबीआयने आपली कार्यवाही थांबविली.
दोन दिवसांपूर्वीच द्रमुकने केंद्रातील यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला. बुधवारी द्रमुकच्या पाच केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे दिले होते. श्रीलंकेतील तामिळ नागरिकांच्या प्रश्नावर केंद्र सरकार कठोर भूमिका घेत नसल्यामुळे पाठिंबा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

Story img Loader