सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी बलात्काराच्या मुद्दय़ावर जे वादग्रस्त विधान केले होते त्यावर टीकेची झोड उठताच त्यांनी आज या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली असून आपल्याला महिलांविषयी आदर असल्याचे म्हटले आहे. महिला संघटनांनी त्यांच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करतानाच राजीनाम्याची मागणी केली आहे.
सिन्हा यांनी एका कार्यक्रमात बोलताना खेळातील सट्टेबाजी कायदेशीर करण्यात यावी असेही मत व्यक्त केले होते. ते म्हणाले, की सट्टेबाजी म्हणजे बेटिंग कायदेशीर करावे व जर कायद्यांची अंमलबजावणी करता येत नसेल, तर त्याचा अर्थ कायदे करू नयेत असा होत नाही. जर बलात्कार अपरिहार्यच असेल तर पडून राहा आणि त्यात आनंद घ्या, हे म्हणणे जसे चुकीचे तसेच हे आहे. जर आपल्या अनवधानाने केलेल्या या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आपण दिलगिरी व्यक्त करतो. महिलांविषयी आपल्याला आदर आहे, लैंगिकतेविषयीच्या प्रश्नांवर आपण वचनबद्ध आहोत, असे ते म्हणाले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे मुख्य संपादक शेखर गुप्ता यांनी संचालन केलेल्या चर्चेत सिन्हा यांनी हे विधान केले होते. या वेळी चर्चेत भारतीय क्रिकेटसंघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड, बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुख आर.एन. सावनी, सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा सहभागी होते. क्रीडा क्षेत्रातील नैतिकता व एकनिष्ठता-कायद्याची गरज व सीबीआयची भूमिका हा या चर्चासत्राचा विषय होता.
रणजित सिन्हा यांच्या विधानावर राष्ट्रीय महिला आयोगासह अनेक महिला संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. महिला आयोगाच्या सदस्या निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी सांगितले, की रणजित सिन्हा यांचे विधान वादग्रस्त आहे. आम्ही त्यांच्या विधानाचा नुसता निषेध करतो असे नाही तर बलात्काराविषयीचा कायदा बदलला जात असताना त्यांनी केलेले विधान बलात्कारासारख्या कृत्याच्याच बरोबरीचे मानतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा