अतिरिक्त संपत्ती आढळल्याप्रकरणी बारा वर्षांपूर्वी सोनिया गांधींचे माजी स्वीय सहायक व्हिन्सेंट जॉर्ज यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला खटला सीबीआयने मागे घेतला. जॉर्ज यांच्या विरोधात सबळ पुरावे उपलब्ध नसल्यामुळे केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) हा खटला मागे घ्यावा लागला. जॉर्ज यांची गांधी घराण्याशी असलेली जवळीक अद्याप कायम आहे.
उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांव्यतिरिक्त संपत्ती आढळून आल्याप्रकरणी सीबीआयने २००१ मध्ये व्हिन्सेंट जॉर्ज यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार १९९० नंतर जॉर्ज आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीमध्ये अचानक मोठी वाढ झाली. त्यात दक्षिण दिल्लीतील घर व दुकान, बंगळुरूमधील घर, चेन्नईमधील जमीन, केरळमधील जमीन व दिल्लीजवळील शेतजमिनीचा सहभाग आहे. त्यांच्या बॅंक खात्यांमध्ये १.५ कोटींच्यावर रक्कम आढळून आली होती.
जॉर्जकडून हवालामार्फत पैसे परदेशात पाठवून तेच पैसे बॅंक व्यवहारांद्वारे आर्थिक भेटींच्या स्वरूपात परत भारतात आणले जात असल्याचा सीबीआयला संशय होता. अमेरिकेशी पत्रव्यवहार करून सीबीआयने या गुन्ह्यासंदर्भात खुलासा मागितला होता. मात्र, अमेरिकेने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे व सबळ पुरावे हाती नसल्यामुळे सीबाआयला जॉर्ज विरोधात आरोपपत्र दाखल करता आले नाही.

Story img Loader