कथीत भ्रष्टाचारप्रकरणाच्या एका प्रकरणात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) कार्यालयावर सीबीआयने गुरुवारी छापेमारी केली. यावेळी साईच्या संचालकांसहीत चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये दोन साईमधील कर्मचारी तर अन्य दोघांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीच्या लोदी रोड भागातील क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये छापे टाकून अटकेची कारवाई करण्यात आली. साईमधील सुत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयचे अधिकारी संध्याकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास जवाहरलाल नेहरु स्टेडिअम येथील साईच्या मुख्यालयात पोहोचले.

सीबीआयने कर्मचाऱ्यांच्या शोध आणि चौकशीसाठी संपूर्ण परिसराला सील करु ठेवले होते. नवी दिल्ली येथील साईच्या परिसरात सीबीआयची छापेमारी सुरुच आहे. दोन महिन्यांपूर्वी या कार्यालयातील कोणीतरी लाच घेतल्याची तक्रार केली होती. सीबीआय याच लाचखोरीच्या प्रकरणात साईच्या कार्यालयावर छापेमारी करीत आहे.

दरम्यान, साईचे महासंचालक नीलम कपूर यांनी सांगितले की, साईमध्ये भ्रष्टाचाराला कोणतीही जागा नाही. त्यामुळे याप्रकरणी करण्यात आलेल्या कोणत्याही कारवाईला आपला पाठींबाच असेल.

Story img Loader