कोळसा खाण वाटप प्रकरणी खास न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता व दोन वरिष्ठ लोकसेवकांसह पाचजणांना आरोपी म्हणून समन्स पाठवले आहे. गुप्ता यांच्या शिवाय कोळसा मंत्रालयातील सह सचिव के. एस. क्रोफा, कोळसा खाण वाटप संचालक के. सी. सामरिया, ब्रह्माणी थर्मल पॉवर प्रा. लि. कंपनी, तिचे अध्यक्ष पी. त्रिविक्रम, उपाध्यक्ष वाय. हरीश चंद्र प्रसाद यांना आरोपी म्हणून समन्स पाठवले आहे.
त्यांना भादंवि गुन्हेगारी कट १२० बी, लोकसेवकाकडून विश्वासघात ४०९, फसवणूक ४२० तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये आरोप ठरवण्यात आले आहेत. विशेष सीबीआय (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) न्यायाधीश भारत पराशर यांनी काल या सर्वाना समन्स पाठवले असून ओडिशातील राम्पिया येथील कोळसा खाण मे. नवभारत पॉवर प्रा. लि. ला देण्यात आल्याबद्दल व त्यातील गैरप्रकाराबद्दल १९ ऑगस्टला न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. जानेवारी २००८ मध्ये हे खाण वाटप झाले होते. न्यायालयाने त्यांना आरोपी म्हणून समन्स काढताना सीबीआयच्या अंतिम अहवालाचा आधार घेतला आहे. तत्कालीन कोळसा सचिव गुप्ता यांनी नियमांचे पालन करून संबंधित कंपन्यांना कोळसा खाण वाटप केले नाही. लोकसेवक म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.

Story img Loader