कोळसा घोटाळा प्रकरणी माजी सीबीआय संचालक रणजित सिन्हा यांच्याविरोधात आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर दाखल केली आहे. रणजित सिन्हा यांची या प्रकरणात चौकशी व्हावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या तीन महिन्यानंतर सीबीआयने सिन्हा यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार एफआयआर दाखल केली आहे. कोळसा घोटाळ्याचा तपास त्यांच्याकडे असताना त्यांनी तपासामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे आरोप सिद्ध झाले तर त्यांना सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(२), १३(१)(ड) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या पदाचा दुरुपयोग करुन चौकशीमध्ये हस्तक्षेप करण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कोळसा घोटाळा प्रकरणाच्या चौकशी दरम्यान रणजित सिन्हा यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळल्यानंतर न्या. एम.बी. लोकूर यांनी चौकशीचे आदेश दिले होते.  माजी सीबीआय प्रमुख एम. एल. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने चौकशी करुन आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केला होता. सिन्हा यांनी या घोटाळ्यातील आरोपींसोबत खासगी भेट घेतल्याचे या समितीने न्यायालयाला सांगितले. त्याच आधारे न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे दिले होते. जी व्यक्ती इतक्या महत्त्वपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे त्या व्यक्तीने आरोपींची स्वतःच्या निवासस्थानी भेट घेणे अयोग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तीन महिन्यानंतर सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे.