ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणातील लाचखोरीचा आणि उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याशी संबंधित पैशांची अफरातफर प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विशेष तपास पथक (एसआयटी) गुरुवारी स्थापन केले.
ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात इटलीतील तपास पथकाकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे सीबीआयच्या पथकाने प्राथमिक तपास केला आहे. या हेलिकॉप्टर खरेदीमध्ये लाचखोरी झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर या व्यवहाराला तत्कालिन संरक्षण मंत्री ए. के अॅंटनी यांनी स्थगिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर लाचखोरीची रक्कम नक्की कोणाला मिळाली, याचा तपास सीबीआयकडून करण्यात येतो आहे. पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर सीबीआयकडून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
विजय मल्ल्या यांच्याविरोधात एकाहून अधिक आरोपपत्र दाखल करण्याचे सीबीआयने ठरवले आहे. आयडीबीआय बँकेचे ९०० कोटींचे कर्ज मल्ल्या यांनी बुडवले असून त्याची चौकशी सीबीआय करीत आहे. त्याचबरोबर या बॅंकेसहित इतर बॅंकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवल्याच्या प्रकरणात मल्ल्या यांची सक्तवसुली संचालनालयाकडूनही चौकशी सुरू आहे.

Story img Loader