शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सोमवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती केली. या घोटाळ्यात चार राज्यांतील गुंतवणूकदारांना सुमारे १० हजार कोटी रुपयांना फसवण्यात आले आहे. सहसंचालक राजीव सिंह यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक चौकशी करणार आहे. या घोटाळ्यात ‘सेबी’चा सहभाग होता का, याची चौकशीही हे पथक करणार आहे.
सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकात पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि ईशान्य भागाचा समावेश असेल, असे सीबीआयचे प्रवक्ते कांचनप्रसाद यांनी सांगितले.
याप्रकरणी प्राथमिक अहवाल (एफआयआर) दाखल करण्याआधी या प्रकरणासी संबंधित सर्व कागदपत्रे लवकरच गोळा करण्यात येतील. घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता या प्रकरणात सीबीआयही लक्ष घालेल, असे ते म्हणाले.
शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी त्वरित सीबीआय चौकशी सुरू करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. याच वेळी राज्यातील पोलिसांना या पथकाला सहकार्य करण्यास सांगितले.
आजवरच्या तपासात अशा प्रकरणात ‘सेबी’ तसेच; कंपनी रजिस्टार आणि रिझव्र्ह बँक अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या तिन्ही महत्त्वाच्या संस्थांच्या निगराणीखाली हा घोटाळ्याचा केवळ जन्मच झाला नाही, तर त्याचे पालनपोषणही झाल्याचे ताशेरे न्या. टी. एस. ठाकूर यांनी आपल्या आदेशात ओढले होते.
याप्रकरणी स्वतंत्र खटले दाखल करायचे की एकच खटला चालवायचा याविषयी विशेष पथक कायदेशीर सल्ला घेणार असल्याचेही कांचनप्रसाद म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा