तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांच्या कॅश फॉर क्वेरी अर्थात प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेण्याच्या प्रकरणात सीबीआयची एंट्री झाली आहे. महुआ मोईत्रा यांची सीबीआय चौकशी सुरु करण्यात आली आहे. लोकपालांनी दिलेल्या निर्देशांनुसार हा तपास सुरु करण्यात आला आहे. सीबीआयने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरु केली आहे. आता सीबीआय ही तपास यंत्रणा महुआ मोईत्रा यांच्यावर गुन्हा दाखल करावा की नाही याचा निर्णय घेणार आहे. प्राथमिक तपासणीच्या अंतर्गत सीबीआय थेट कुणाला आरोपी ठरवू शकत नाही तसंच कुणाला अटकही करु शकत नाही. चौकशी करण्याचा आणि कागदपत्रं तपासण्याचा अधिकार या एजन्सीला आहे. त्यामुळे या प्रकरणात महुआ मोईत्रा यांची चौकशी होऊ शकते.
या प्रकरणात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहद्राई यांनी तक्रार दाखल केली. त्यांनी हा आरोप केला होता की महुआ मोईत्रा यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैशांच्या मोबदल्यात प्रश्न विचारले. त्यांच्याकडून लाच स्वीकारली आणि मोदी सरकारला अडचणीत आणण्यासाठी गौतम अदाणींवरुन प्रश्न विचारण्यात आले होते.
हे पण वाचा- “नीतीमत्ता समितीने अत्यंत गलिच्छ आणि हीन प्रश्न विचारत पातळी सोडली म्हणूनच…”, महुआ मोईत्रांची प्रतिक्रिया
दर्शन हिरानंदानी यांनी हा आरोप केला की तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मला एक इमेल आयडी पाठवला होता. ज्यावर मी त्यांना माहिती पाठवू शकत होतो तसंच त्यांना प्रश्न कुठले विचारायचे आहेत याची चर्चा सुरु करु शकतो. तसंच महुआ मोईत्रा यांनी त्यांचा लॉग इन पासवर्डही मला दिला होता असाही आरोप दर्शन हिरानंदानी यांनी केला होता.
महुआ मोईत्रा यांना राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध व्हायचं होतं. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी, निकटवर्तीयांनी त्यांना सल्ला दिला की प्रसिद्ध व्हायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत पातळीवर टीका कर. त्यामुळेच महुआ मोईत्रा यांनी हे सगळं केलं.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (२३ नोव्हेंबर) महुआ मोईत्रा यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर भाष्य केले. “मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तशी योजना आखण्यात आली आहे. मात्र, यामुळे मोईत्रा यांना आगामी निवडणुकीसाठी फायदाच होणार आहे”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्या कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या.
ममता बॅनर्जी यांनी सर्व आरोप फेटाळले
महुआ मोईत्रा यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी तसे आरोप केले होते. हे आरोप करताना त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. दुसरीकडे मात्र मोईत्रा यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.