जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अंबानी यांच्याशी संबंधित फाइल्स क्लिअर करण्यासाठी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती असा दावा केला होता. त्यानंतर सत्यपाल मलिक यांना लाच दिल्याच्या आरोपाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी खुद्द जम्मू-काश्मीर प्रशासनाने सीबीआयकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची शिफारस केली आहे.
राजस्थानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मलिक यांनी हे दावे केले होते. “काश्मीरला गेल्यानंतर माझ्याकडे दोन फाईल्स आल्या. एक फाईल अंबानींची होती आणि दुसरी आरएसएसशी संलग्न असलेल्याची होती जे आधीच्या मेहबुबा मुफ्ती-भाजपा युती सरकारमध्ये मंत्री होते. ते पंतप्रधान मोदींच्याही जवळचे होते. मला सचिवांनी माहिती दिली की यात घोटाळा झाला आहे आणि त्यानंतर या दोन फायलींशी संबंधित व्यवहार रद्द करण्यात आला. दोन्ही फायलींसाठी १५०-१५० कोटी रुपये दिले जातील, असे सचिवांनी सांगितले. पण मी त्यांना सांगितले की मी पाच कुर्ता-पायजामा घेऊन आलो आहे आणि तेच घेऊन निघणार आहे,” असे मलिक म्हणाले होते.
“मी दोन्ही फायलींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलो होतो. मी त्यांना सांगितले की, या फाइलमध्ये घोटाळा आहे, हे लोक त्यात गुंतलेले आहेत. ते तुमचे नाव घेत आहेत. तुम्हीच सांगा काय करू. मी त्यांना सांगितले की मी फाईल्स पास करणार नाही. ते पूर्ण करायचे असेल तर मी पद सोडतो, दुसऱ्याकडून करून घ्या. मी पंतप्रधानांचे कौतुक करेन कारण त्यांनी सत्यपाल भ्रष्टाचारावर तडजोड करण्याची गरज नाही, असे सांगितले होते,” असेही मलिक यांनी म्हटले होते.
जम्मू-काश्मीर हे देशातील सर्वात भ्रष्ट ठिकाण – सत्यपाल मलिक
सत्यपाल मलिक यांनी यापूर्वीही जम्मू-काश्मीरबाबत अनेक दावे केले आहेत. जम्मू-काश्मीर हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्यांपैकी एक आहे. काश्मीर हे देशातील सर्वात भ्रष्ट ठिकाण असल्याचे मलिक म्हणाले होते. “संपूर्ण देशात चार ते पाच टक्के कमिशनची मागणी केली जाते, मात्र काश्मीरमध्ये १५ टक्के कमिशनची मागणी केली जाते. माझ्या काळात काश्मीरमध्ये भ्रष्टाचाराचे एकही मोठे प्रकरण समोर आले नाही. मी गरीब माणूस असल्याने देशातील कोणत्याही ताकदवान माणसाशी लढू शकतो. माझ्याकडे निवृत्तीनंतर राहायला घर नाही, त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही,” असेही सत्यपाल मलिक म्हणाले होते.
दरम्यान, सत्यपाल मलिक हे सध्या मेघालयचे राज्यपाल आहेत, मात्र घटनात्मक पद भूषवत असतानाही ते अनेकदा राजकीय विषयांवर खुलेपणाने बोलले आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी सरकारवर घेरले होते. सत्यपाल मलिक यांनी अनेकवेळा कृषी कायद्यांवरून सरकारवर टीका केली आहे.